रोहा दि २१ सप्टें. विशेष प्रतिनिधी ;-
शहरात करोडों रुपयांची कामे परंतु रोहेकरांच्या मागणीतील सुसज्ज दर्जेदार हॉस्पिटलच्या मागणीला न्याय नाही...
रोहा शहराच्या शैक्षिणक, सांस्कृतिक कार्याशी कायम ऋणानुबंध असलेले अमित गुजर यांचा चिरंजीव जिनील (वय २१) याचा नुकताच रोहा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला... मंगला एक्सप्रेस रेल्वे गाडीतून रोहा येथे प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तोल गेल्याने खाली पडला...त्यात जिनील गंभीर जखमी झाला...त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली... सर्वच रोहेकरांशी नाळ असलेल्या अमित गुजर यांचा चिरंजीव रेल्वे अपघाती गेल्याच्या वृत्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोहेकरांना अश्रू अनावर झाले...सर्वच रोहेकारांनी हळहळ व्यक्त केली...जिनील याच्या अपघाती मृत्यूचा साऱ्यांनाच धक्का बसला...शहरात मोठे सुसज्ज, अद्ययावत यंत्रणा असलेले हॉस्पिटल असते तर जिनीलचा जीव वाचू शकला असता, पण शहरात करोडों रुपयांची सुशोभीकरणाची कामे झाली परंतु रोहेकरांच्या वर्षानुवर्षे मागणीतील सुसज्ज दर्जेदार हॉस्पिटलच्या मागणीला अजून न्याय मिळाला नाही...
हॉस्पिटल आणि वैद्यकीय सुविधेसाठी तरुण एकवटले
हॉस्पिटल नसल्याने आतापर्यंत अनेकांचा जीव गेला,त्यातच गोंडस जिनीलची भर पडली...असा संताप व्यक्त करत आतातरी हॉस्पिटलसाठी झटू या, असा संकल्प रोहेकरांनी शासकीय विश्रामगृहात केला, यावेळी रोह्यातील शेकडो नागरिकांनी युवकांच्या हाकेला प्रतिसाद देत उपस्थिती लावली... हॉस्पिटलची मागणी कोणीही लोकप्रतिनिधी पूर्ण करणार नाहीत...त्यामुळे नागरिकांनी आपल्या हक्काच्या आरोग्य सेवांसाठी संघर्षाचे पाऊल उचलले पाहिजे...यावेळी दर्जेदार हॉस्पिटल उभारणीचा केलेला संकल्प तडीस जावो हीच जिनील याच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरणार, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या...
हॉस्पिटल आणि सुविधांसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार ; बैठकीत निर्णय
रोहा तालुक्यात भव्य इंडस्ट्रीयल एरिया, रेल्वे जंक्शन, सुशोभित नदी, भव्य राज्यमार्ग, शिक्षण संस्था, नगरपालिकेचे सशुल्क गार्डन, गगनचुंबी इमारती आणि केवळ ७५ किमी अंतरावर नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे...या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला करोडो रुपयांचा कर रुपाने महसूल मिळतो...परंतु रोहा तालुक्यात आजही एकही अद्ययावत रुग्णालय नाही, ही येथील जनतेची खंत आहे... कोकण रेल्वेच्या गाड्या आणि औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱ्या कंटेनर ट्रेलर इत्यादी वाहनांमुळे येथे अनेकवेळा जीवघेणे अपघात घडतात...रासायनिक कंपन्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन स्थानिक जनतेला अनेक असाध्य रोगांना सामोरे जावे लागते...त्यामुळे रोहा तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरसह अद्ययावत रुग्णालय उभारले जावे, ही येथील जनतेची पंधरा वीस वर्षांपासूनची मागणी आहे...
रोह्यातील नागरिकांमध्ये या घाणेरड्या राजकारणाविषयी तीव्र संताप व्यक्त
वर्षानुवर्षे रोह्यातील गलिच्छ व घाणेरड्या राजकारणामुळे अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त व सुसज्ज अशा हॉस्पिटलचा प्रश्न प्रलंबितच आहे...वर्षानुवर्षे रोह्यातील विविध सामाजिक संस्था अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल व्हावे यासाठी ढोपर झिजवत आहेत...प्रत्येक निवडणुकांच्या वेळी हॉस्पिटल उभारणी संदर्भात आश्वासन दिले जाते...मात्र आजपर्यंत सुसज्ज हॉस्पिटल कोणत्याही राजकीय पक्षाने बांधले नाही... त्यामुळे रोह्यातील नागरिकांमध्ये या घाणेरड्या राजकारणाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...विविध आजार, अपघात यावरील उपचारासाठी रोह्यातील नागरिकांना वाशी, पनवेल, मुंबईला जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत...अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यात मृत्यू झालेला आहे....त्यामुळे येथील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना जाग येईल तरी कधी? असा सवाल आता थेट जनतेतून विचारला जाऊ लागला आहे...

