पेण प्रतिनिधी
गडकरी, रविंद्र चव्हाण यांनी राजीनामे द्या, शिवसैनिकांची मागणी
पेण दि.०६सप्टेंबर : तब्बल १३ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथ्यांदा भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते...यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा देत जाहीर केले होते... कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल... दहा हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत असे त्यावेळी गडकरी म्हणाले होते...तर गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहाणी दौरा करतेवेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते...परंतु काम आजही रखडलेल्या अवस्थेत असुन काही करून मात्र या लेनचे काम जरी युद्धपातळीवर सुरू असले तरी या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे सातत्य तर नाहीच शिवाय हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समीर म्हात्रे यांनी सांगितले...
समीर म्हात्रेंच्या संकल्पनेतून व केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या आदेशानुसार खारपाडा ते पांडापुर २५ किमी महामार्गावरील दौरा
समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या आदेशानुसार या निकृष्ट कामाची पोलखोल करण्यासाठी शिवसैनिकांनी,दि.६.सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खारपाडा ते पांडापुर या जवळपास २५ किलोमिटरच्या महामार्गावरील दौरा केला...यावेळी सुरु असणाऱ्या पोलखोल दौऱ्यातून सदर कामाची प्रत, कामाचा दर्जा आणि कामाचे व्यवस्थापन याची पोलखोल केली...
दोनशे वर्षे काय पण दोनशे दिवस देखील टिकणार नाही.. जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी लगावला टोला
जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी बोलतांना नितिन गडकरी यांनी जनतेला दिलेल्या आश्वासना बद्दल सांगितले... रस्ता आता दोनशे वर्षे पाहायला नको पण दोनशे वर्षे काय दोनशे दिवस देखील टिकणार नाही असा टोला लगाऊन कामाला कोणतीही क्वालिटी नाही, कामासाठी सल्लागार कोण आहेत, इंजिनीयर कोण आहेत याचाच थांगपत्ता नाही, या उलट फक्त निवडणुका जवळ आल्याने काम केल्याचे दाखवायचे म्हणुन हे निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे असे सांगितले... तर सदर पोलाखोल दौऱ्याची ज्यांनी संकल्पना मांडली त्या समीर म्हात्रे यांनी बोलतांना हे काम निकृष्ट दर्जाचे तर आहेच शिवाय लेनच्या साईट पट्टी देखिल धोकादायक आहेत... त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे...समृध्दी महामार्गावर अपघात झाल्यानंतर जर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये भरपाई देण्यात येत असेल तर या मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यावर देखील हीच भरपाई मिळावी आणि ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा... असे सांगुन महिन्यातून तीनवेळा पाहाणी करून निकृष्ट दर्जाचा काम होत असेल तर बांधकाम मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा असे स्पष्ट केले...
पोलखोल दौऱ्यात शिवसेना सहसंपर्कप्रमुख किशोर जैनसह आदी शिवसैनिक उपस्थित
पोलखोल दौऱ्यात शिवसेना सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, समन्वयक नरेश गावंड, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हाञे, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हाञे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, समिर म्हाञे, विनोद म्हाञे, प्रविण पाटील, महिला आघाडीच्या दर्शना जवके,रविंद्र पाटील, दिलीप पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते...

