उरण प्रतिनिधी:(विठ्ठल ममताबादे )
चिरनेर-खारपाडा महामार्गावरील निवासस्थानी शोकसभेचे आयोजन
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद दिवंगत बाजीराव परदेशी यांचे २४ ऑगस्ट २०२३ रोजी आकस्मिक निधन झाले आहे..त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या चिरनेर - खारपाडा महामार्गावरील निवासस्थानी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते... अत्यंत शोकाकूल वातावरणात पार पाडण्यात आलेल्या या जन सामान्यांच्या कार्यासाठी अहोरात्र तत्परता दाखविणाऱ्या नेत्याच्या कार्याची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडतांना बहुतांशी वक्त्यांना अश्रू अनावर झाले...
समाजाची बांधिलकी जपत प्रतिकूल परिस्थितून निवडणूक नियोजन कौशल्य त्यांचे शक्तिस्थान
उरण पूर्व विभागातील गरीब सामान्यांसह सर्वांच्या हृदयातील मुकुटमणी बनलेले बाजीराव परदेशी यांनी सामाजिक कार्यातही आपली ओळख निर्माण केली होती... अजात शत्रू मानले जाणाऱ्या परदेशी यांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासह तालुक्यातील स्वयंसेवी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दर्शविली होती...त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस पक्षासह समाजाची मोठी हानी झाल्याचे सर्वांच्याच मनोगतात ऐकवयास मिळाले... तर पुर्वी हलाखीच्या परिस्थितीमुळे अर्थातच त्यांना मनाजोगते शिक्षण घेता आले नाही..पण मुळातच अंगी विजिगिषु वृत्ती असणाऱ्या या व्यक्तिमत्वाने परिस्थितीशी सामना करीत असतांना समाजाची बांधिलकी जपत प्रतिकूल परिस्थितून पुढे येऊन कुटुंबियांना सुखाचे दिवस दाखविले आहेत...तर निवडणूक नियोजन कौशल्य हे त्यांचे शक्तिस्थान होते...पक्ष संघटनेच्या कामातला त्यांचा झपाटा वाखाण्याजोगा होता...निवडणुकीच्या वेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन एक दिलाने व जोमाने ते काम करीत होते...
कुटुंबीय,हितचिंतक आणि पंचक्रोशीतील जनसामान्य नागरिक शोकसभेसाठी उपस्थित
शोक सभेसाठी कॉग्रेस नेते आर.सी. घरत, महेंद्र ठाकूर, मिलिंद पाडगावकर, कामगार नेते भूषण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, जे .डी.जोशी,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उद्योजक तेजस डाकी,चिरनेरचे माजी सरपंच संतोष चिर्लेकर यांच्यासह बाजीराव परदेशी यांचे कुटुंबीय,हितचिंतक आणि पंचक्रोशीतील जनसामान्य नागरिक या शोकसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते...