माणगाव :- (नरेश पाटील): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत रायगड जिल्हा युवती अध्यक्षपदी सौं. हर्षदा संदीप वरवाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांच्या हस्ते, दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा नियुक्ती सोहळा पार पडला...
पोलादपूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या हर्षदा वरवाटकर यांनी अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाच्या तुतारी चिन्हावर उमेदवारी देत सक्रिय राजकीय सहभाग नोंदवला होता. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेली बांधिलकी याची दखल घेत रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावाची ठाम शिफारस केली होती...
विशेष म्हणजे, रवींद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मजबूत करण्यासाठी सातत्याने संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले असून, नव्या नेतृत्वाला संधी देण्याची त्यांची भूमिका ठळकपणे दिसून येत आहे. युवती संघटन उभारणीसाठी सक्षम आणि कार्यक्षम नेतृत्व पुढे आणण्याचा त्यांचा दृष्टीकोन या नियुक्तीतून अधोरेखित झाला आहे. पक्षाच्या विस्तारासाठी आणि नव्या पिढीला राजकारणात सक्रिय करण्यासाठी चव्हाण यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे...
हर्षदा वरवाटकर यांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्यातील युवती संघटनाला नवे बळ मिळणार असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...
दरम्यान, रायगड जिल्हा कार्यकारिणीकडून हर्षदा वरवाटकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत...
