महाराष्ट्र वेदभुमी

पोवार वाडा येथे एसटी थांब्यासाठी दुसरे स्मरणपत्र; तातडीने कार्यवाहीची मागणी

माणगाव : (नरेश पाटील) दि. २० एप्रिल २०२६ — माणगाव शहरातील मोरबा रोडवरील पोवार वाडा या महत्त्वाच्या जंक्शनवर एसटी थांबा मंजूर करून प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी अखेर दुसरे स्मरणपत्र सादर करण्यात आले... माणगाव आगार व्यवस्थापकांना हे निवेदन माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले... यावेळी आमचे प्रतिनिधी तसेच एकता मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य आणि माणगाव एसटी आगारातील वरिष्ठ तंत्रज्ञ अजित पवारही उपस्थित होते...

काही वर्षांपूर्वी खांदाड येथील ‘एकता मित्र मंडळ’ या मित्रपरिवाराने सदर ठिकाणी एसटी थांबा सुरू करण्याची मागणी आगार व्यवस्थापकांकडे मांडली होती... त्यानंतर एक भव्य कार्यक्रमही घेण्यात आला होता, ज्यामध्ये आगार व्यवस्थापक, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, खांदाड येथील ज्येष्ठ नागरिक, एकता मित्र मंडळाचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

दरम्यान, एकता मित्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष निर्णे सर यांनी संबंधित सर्व शासकीय विभागांकडे पाठपुरावा करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. रायगड विभागीय एसटी पेण कार्यालयानेही या मागणीची दखल घेत जागेची पाहणी केली, थांब्यास मंजुरी दिली व फलकही देण्यात आले होते... इतके सर्व होऊनही प्रत्यक्षात थांबा सुरू झाला नाही. यापूर्वी एकदा स्मरणपत्र देण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही...

अलीकडेच एकता मित्र मंडळाच्या तिमाही बैठकीत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला... त्यानुसार माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन दुसरे स्मरणपत्र सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला... त्यानुसार सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी हे निवेदन देण्यात आले असून, मोर्बा रोडवरून ये-जा करणाऱ्या सर्व एसटी बसांना पोवार वाडा येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांना बस पकडणे व उतरणे सुलभ होईल... निवेदन स्वीकृत करताना संबंधित आगार व्यवस्थापकांनी या विषयावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले...

यावेळी झालेल्या चर्चेत असेही नमूद करण्यात आले की, पोवार वाडा हे ठिकाण केवळ जंक्शन नसून ते बामणोली रोडला जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे तसेच श्रीवर्धन बायपासमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (NH-66) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी एसटी थांबा असणे वाहतूक आणि प्रवासी सुविधांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरत आहे...

माणगाव शहर झपाट्याने विकसित होत असून मोर्बा रोडवरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतचा जुना थांबा वाहतूक कोंडीमुळे अडचणीचा ठरत आहे... वाहतूक पोलिसांनीही एसटी आगारास काही अंतर मागे थांबा हलवण्याचा सल्ला दिल्याचे समजते... पोवार वाडा परिसरातील नागरिकांना सध्या बससाठी लांब अंतर चालावे लागत असल्याने हा थांबा अत्यंत गरजेचा असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे...तसेच गणेशोत्सव, सुट्टीचे दिवस आणि सप्ताहांताच्या काळात या ठिकाणी थांबा सुरू झाल्यास वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळण्यासोबतच माणगाव एसटी आगाराच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे...त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांच्या सोयीसाठी हा एसटी थांबा तातडीने सुरू करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post