कोलाड (श्याम लोखंडे): ही कोकणची भूमी त्यामुळे पूर्वी खांब विभागात नाना प्रकारचे लोक ते खूप व्यसनाधीन होत असत ६८ वर्षापूर्वी वै.सद्गुरू अलिबाकर महाराज, गोपाळ बाबा वाजे,धोंडू बाबा कोलाटकर, यांनी या परिसरात कोणतीही अपेक्षा न करता संत रुपी ज्ञानातून त्यांना आध्यात्मिक विचारांची भक्तीची गोडी लावून सुरवातीच्या काळात वै.नारायणदादा माने, मोरेश्वर मामा मांगुलकर,नारायण दादा लोखंडे, सदाशिव वरखले, काशिराम गोसावी, यांच्या संकल्पनेतून या परिसरात वारकरी संप्रदाय उदयास आले त्याची गोडी निर्माण झाली म्हणून आज हा आनंदाचा उत्सव साजरा होत असताना दिसत आहे.या संत महात्म्यांनी लावलेले इवलेसे रोप आणि त्याचा वेणु आज खऱ्या अर्थाने गगनापरी जात असल्याचे दिसून येत आहे... अनेक वर्ष या पंचक्रोशीत नित्यनेम हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीने साजरा केला जात आहे... त्यामुळे कामासोबत भक्ती मार्ग आणि रामाचे भक्ती करा निश्चितच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असे मत हभप रामदास महाराज टोंगले यांनी चिल्हे येथील कीर्तनरुपी सेवेतून प्रकट केले...
रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ पंचक्रोशी खांब यांचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिल्हे येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या किर्तनरुपी सेवेप्रसंगी रामदास महाराज टोंगले यांनी कामामध्ये काम । काही म्हणा रामराम । जाईल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ।।
कळों येईल अंतकाळी । प्राणप्रयाणाचे वेळी । राहाती निराळी । रांडापोरे सकळ ।।
जिता जीसी जैसातैंसा । थोर आहे रे वोळसा । उगवूनि फांसा । काय करणे ते करी ।।
केले होते याचि जन्मे । अवघे विठोबाच्या नामे । तुका म्हणे वर्में । जाणोनिया तरती ।। या अभंग रूपी सेवेतून उपस्थित भाविकांना भक्तीच्या मार्गाचे मार्गदर्शन केले...
कार्यक्रमाप्रसंगी निवडलेल्या अभंगातून टोंगेल महाराज यांनी विवेचन करतांना पुढे सांगितले की तुकाराम महाराज लोकांना उद्देशून म्हणतात की तुम्ही येथे संसाराच्या रगाड्यात कितीही व्यस्त असलात तरी किंवा कितीही कामात गुंतलेले असलात तरीही त्या कामात अजून एक काम करा किंवा वाढवा आणि ते म्हणजे इतर कामे चालू असताना मुखाने 'रामराम' म्हणायचे काम करा कारण ते म्हणतात अशाने केव्हा तुमचा भवश्रम कमी होईल किंबहुना केव्हा तो संपूर्णपणे जाईल किंवा पूर्णपणे निवारेल हे तुम्हाला कळणारही नाही आणि त्यामुळे मुख्य म्हणजेच संसारातील सर्व दुःखाचे मग सुखात परिवर्तन होईल ते वेगळेच...
ते पुढे म्हणतात 'रामनाम' म्हणण्यामागचे मुख्य कारण तुम्हांला अंतकाळी कळून चुकेल किंबहुना ते प्रकर्षाने जाणवू लागेल... ते म्हणतात जेव्हा प्रयाणाचा काळ येऊन ठेपतो आणि प्राण सोडून जावयास लागतो तेव्हा त्या कठीण समयी आपल्या मदतीला कोणीही धावून येत नाही किंबहुना आपली सर्व रांडापोरे(आपली स्त्री आणि मुले) हे सर्वजण कसे नामानिराळी राहतात ते दिसून येते किंबहुना ती असूनही नसल्यासारखीच होतात...
म्हणून ते म्हणतात की तू जिवंत असतानाच मी जे काही सांगतो आहे ते कर आणि कसेही कर कारण पुढे मरणाचे फासे तुझी वाट पाहत आहेत, पुढे मरणानंतर थोर वळसा आहे कारण मरणाअंती पुनरुपी तुला नरदेहच प्राप्त होईल ह्याची काहीही शाश्वती नाही... त्यामुळे तू लवकरात लवकर ह्यातून बाहेर पडून म्हणजेच तुझ्या भोवतीच्या ह्या जाळ्यातून तू बाहेर पडून काय करायचे ते तातडीने कर किंवा करावयास तातडी कर...
तुकोबाराय शेवटी म्हणतात की ज्यांनी ज्यांनी ह्याच मिळालेल्या जन्मात विठोबाचे नाम घेतले, त्याचे चरण धरले आणि त्याला शरण गेले त्यांनाच ह्या संसाराचे मुख्य वर्म कळून चुकले आणि तेच ह्यातून, ह्या भवसागरातून सुखरूप तरले आणि पार झाले...
६९ अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून या सोहळ्यात सकाळी काकडा आरती, श्री संत ज्ञानेश्वरी गाथा पारायण, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन,महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज यांचे प्रवचन आणि किर्तन सेवा या ठिकाणी होत आहे यासाठी खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे या पंचक्रोशीचे यजमान चिल्हे ग्रामस्थ, युवक, युवती, आणि महिला मंडळ या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेत आहेत...
