महाराष्ट्र वेदभुमी

वाघ-मानव संघर्ष तीव्र; संयुक्त बैठकीची मागणी


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- तालुक्यातील देवलापार परिसरात वाढत्या वाघ-मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या विलंबामुळे नाराजी तीव्र होत आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी देवलापार परिसर जनहित संरक्षण समितीतर्फे सुरू असलेल्या धरना आंदोलना चा तेरावा दिवस असून रोज १००-१५० आंदोलनकारी आंदोलन स्थळी येऊन आपल्या समस्या मांडत असतात. आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळत आहे. समितीने पेंच व्याघ्र प्रकल्प, वन विभाग, एफडीसीएम व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक आंदोलनस्थळी घेण्याची ठाम मागणी केली आहे. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी नागपूर आणि उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना अप्पर तहसीलदार, देवलापार यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे. समितीचे संयोजक हरिचंद्र सरियम यांनी सांगितले की, “परिसरात वाघ व बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अनेक घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग . स्वीकारावा लागला आहे.”समितीच्या निवेदनानुसार, प्रस्तावित बैठकीत स्थानिक नागरिकांच्या सर्व तक्रारी व मागण्या ऐकून त्यावर सविस्तर कार्यवृत्त (Minutes of Meeting) तयार करून अंमलबजावणीसाठी स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी समितीचे संरक्षक विजय कोकोडे, समितीचे अध्यक्ष हरिष उईके, माजी समाजकल्याण सभापती दुर्गावती सरियाम, माजी जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, कैलास निघोट, चिंतामण वरकडे, शहारू मरसकोल्हे,  वडांबा सरपंच मुकेश दुबे, डोंगरताल चे उकेसराव उईके, माजी सरपंच शेखर खंडाते, माजी सरपंच ताराचंद सलामे, रमेश ठाकरे, गजानन ढोरे, मुस्ताक पटेल,ग्रा. पं. सदस्य मिराबाई, किरण सलामे, भारत कुमरे लव कुश नागपुरे, वसंत कोडवते, फुलचंद धूर्वे इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post