मेळघाट, ताडोबा प्रयोगानंतर पेंच वनपरिक्षेत्रात नवा प्रयोग
सचिन चौरसिया रामटेक
रामटेक :- वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धनासाठी प्रशासनाने एक अनोखा आणि अभिनव उपक्रम राबवला आहे... जंगलात वाघाच्या पावलांच्या ठशांच्या (पगमार्क) आकारातील कृत्रिम आकर्षक पाणवठे तयार करण्यात आले असून वनसंवर्धनासोबतच पर्यटनालाही नवी दिशा दिली जात आहे... पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरीक्षेत्रातील अंबाझरी तिप्पट, टूयापार रोड, टायगर पाणवठा घाटमारा, भाटा रोड टी-पॉइंट आणि बाजारकुंड या ठिकाणी ‘पगमार्क’ आकारातील कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले आहेत... वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार उपसंचालक अक्षय गजभिये आणि सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिमगावकर यांचे मार्गदर्शन हे पाणवठे अगदी पर्यटन मार्गालगत तयार करण्यात आले आहेत... आता प्रत्यक्ष वाघाच्या पंजाच्या आकाराची पाणवठे तयार करून पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात आता निसर्ग आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे... या पाणवठ्यांची रचना विशेषतः सर्व प्रकारच्या वन्यजीवांसाठी करण्यात आली आहे... मोठ्या प्राण्यांसोबतच लहान पक्षी आणि सूक्ष्म जीवांनाही सुरक्षितपणे पाणी पिणे शक्य होईल, अशा पद्धतीने निर्माण करण्यात आले आहे...
◼️ पेंच वनपरिक्षेत्रात नवा प्रयोग
याआधी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे असे प्रयोग यशस्वी ठरले होते... त्याच अनुभवाच्या आधारे पेंचमध्ये हा उपक्रम अधिक आधुनिक आणि आकर्षक स्वरूपात राबवण्यात आला आहे... नैसर्गिक दगडांचा आणि मातीचा वापर करून तयार केलेले हे पाणवठे जंगलाच्या मूळ रूपाला धक्का न लावता वन्यजीवांची तहान भागवणार आहेत...
◼️संकल्पना नक्कीच जैवविविधतेत भर घालणारी
“उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. ‘पगमार्क वॉटर होल’ संकल्पना नक्कीच जैवविविधतेत भर घालणारी ठरेल...”वन्यजीव संवर्धन, कलात्मकता आणि पर्यटनाचा संगम साधणारा हा उपक्रम पेंचमध्ये एक नवा आदर्श निर्माण करत असून, पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रेरणा देणारा ठरत आहे. निसर्गाशी नाते जोडणारा आणि वन्यजीवांसाठी जीवनदायी ठरणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे... असा विश्वास चोरबाहुलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी व्यक्त केला आहे...
