चौल (ओमकार नागावकर) : स्व. डॉ. अच्युत महादेव ओक यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवार दि. २६ मार्च २००१ रोजी स्थापन झालेल्या ‘जेष्ठ नागरिक संस्था, चौल’ने आज २५ वर्षांची उल्लेखनीय आणि प्रेरणादायी वाटचाल पूर्ण केलीय... अवघ्या २८ सभासदांपासून सुरू झालेल्या या संस्थेने समाजकार्य, संस्कार आणि एकोप्याच्या बळावर एक भक्कम ओळख निर्माण केलीय...
संस्थेचे पहिले अध्यक्ष मुकुंद गजानन मनोहर यांच्या १४ वर्षांच्या कार्यकाळात सभासद संख्या २८ वरून तब्बल ८७ पर्यंत वाढली... त्यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी ट्रस्ट, मुंबईच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप, महाड पुरग्रस्तांना मदत, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, मोफत वाचनालय व अल्प भाड्यात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले... या कार्याची दखल घेत २००५ साली संस्थेला ‘उत्कृष्ट ग्रामीण संघ’ हा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा पुरस्कारही प्राप्त झाला...
संस्थेने केवळ सामाजिकच नव्हे तर सांस्कृतिक परंपराही जपल्या... मासिक सभांमध्ये वाढदिवस साजरे करणे, पावसाळी-हिवाळी सहली, ज्येष्ठ नागरिक दिन, कोजागिरी, मकरसंक्रांत असे विविध सण-उत्सव साजरे करून चौल परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली.... या वाटचालीत वासुदेव व उषाताई वैद्य, सदानंद राऊत, श्रीकृष्ण लेले, सुरेश विद्वांस, दिनानाथ वर्तक, पुखराज चौधरी, मधुसूदन राईलकर, श्री व सौ. पटवर्धन, रामगीरी बुवा आदी मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले... सन २०१५ मध्ये श्रीकृष्ण वासुदेव लेले यांनी द्वितीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या कामाला नवे परिमाण मिळाले... त्यांच्या कार्यकाळात २०१५-१६ मध्ये संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली... स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, एस.टी. पास शिबिर, कोयना पुरग्रस्तांना मदत, संजय गांधी निराधार योजना, अनाथ बालकांसाठी सहाय्य, संस्कार वर्ग आणि करोना काळात ऑनलाईन सभा अशा विविध उपक्रमांनी संस्थेचा सामाजिक विस्तार अधिक मजबूत केला... या काळात काही काळ श्री. रमेश म्हात्रे यांनीही अध्यक्षपदाची धुरा सांभाळली...
१ एप्रिल २०२२ पासून सतीश दत्तात्रेय मनोहर यांनी तिसरे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर संस्थेला नवचैतन्य लाभले... “President is one amongst equal” या विचाराने सर्वांना सोबत घेऊन काम करत त्यांनी कोरोना काळात घटलेली सभासद संख्या पुन्हा ८१ पर्यंत वाढवली. “सबका साथ, सबका आनंद” या ब्रीदवाक्यांतर्गत गेल्या दोन वर्षांत व्याख्याने, मुलाखती, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यांमुळे संस्थेची उपक्रमशीलता अधिक बळकट झाली... १ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या रौप्य महोत्सव वर्षाची सांगता आता भव्य सोहळ्याने होणार आहे... वर्धापन दिन व रौप्य महोत्सव सांगता सोहळा शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी चौल येथील श्री मुख्य (मुखरी) गणपती मंदिर सभागृहात पार पडणार आहे...
या कार्यक्रमासाठी कोकण विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विलास काळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, रायगड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश बाबुराव पालकर व कोकण विभाग महाराष्ट्र महासंघाचे सचिव दिपक करकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत... दुपारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ठाणे येथील सुप्रसिद्ध गायक राहुल कुलकर्णी यांची संगीत मैफिल रंगली. या सोहळ्याचे आयोजन सतीश दत्तात्रेय मनोहर (अध्यक्ष), देवानंद दत्तात्रेय पोवळे (सचिव), रोहिदास म्हात्रे (रौप्य महोत्सव समिती अध्यक्ष), विनोद जाधव (सचिव) आणि दिपक सखाराम तळेकर (उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे... चौलच्या सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठसा उमटवणाऱ्या या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हा सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरला...
