महाराष्ट्र वेदभुमी

होळीपूर्व माणगावात वाहनांचा महापूर; प्रशासन सज्ज

माणगाव :- (नरेश पाटील) रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीमुळे माणगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर प्रचंड वाहतूक ताण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले... दुपारी सुमारे १.०० वाजता आमचे प्रतिनिधी महामार्गावर प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत असताना, वाहनांची अखंड ये-जा सुरू असली तरी वाहतूक कासवगतीने सुरू असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले... सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी,धार्मिक स्थळी आणि पर्यटन ठिकाणी प्रवास करत असल्याने वाहतुकीचा वाढलेला दबाव स्वाभाविक असला, तरी वाहतूक नियंत्रणासाठी अधिक प्रभावी नियोजनाची गरज जाणवत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले...

 सदर वृत्त हा वाहतूक परिस्थितीवरील दुसऱ्या दिवसाचा अहवाल आहे...महामार्गावर लांबलचक ट्रेलर्स, टँकर्स, मोठे डंपर्स, अवजड ट्रक्स तसेच विविध मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली... या अवजड वाहनांमुळे वाहनांचा वेग मंदावून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र होते... बाजारपेठ परिसरात एका नॅनो कारचा मोठ्या ट्रेलरला किरकोळ स्पर्श झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती; मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कौशल्यपूर्ण पद्धतीने वाहतूक सुरळीत केली... प्राथमिक पाहणीत कार चालकाची चूक असल्याचे समोर आले असले तरी होळी सणानिमित्त अवजड वाहनांवर निर्बंध असताना अशा वाहनांची महामार्गावरील उपस्थिती नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे...

शहरातील सर्व प्रमुख चौक दिवसभर वाहनांनी गच्च भरलेले दिसून आले. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनासोबत आरटीओ विभाग, एसटी कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सक्रियपणे मदत करताना दिसले... पोलीस गस्त पथकांची वाहनेही रस्त्यांवर सातत्याने फिरताना दिसून आली असून वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे जाणवले. बाजारपेठेत महाडकडे जाणाऱ्या मार्गावर एका लेनमध्ये चार-चार वाहनांच्या रांगा लागल्याचे तर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन रांगा दिसून आल्या...

सणाच्या गर्दीचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही प्रकर्षाने जाणवला. बामणोली रोड, कचेरी रोड, साईनगर तसेच उत्तेखोल मार्गावरील अंतर्गत रस्ते वाहनांनी पूर्णपणे भरून गेले होते... मात्र मोर्बा रोड (पवार वाडा मार्गे) बामणोली रोडमार्गे मुंबईकडे एनएच-६६ ला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गावर वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले... याशिवाय पुणे–दिघी मार्ग (निजामपूर रोड) तसेच दिघी–पुणे मार्ग (मोर्बा रोड) येथेही सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले...

दरम्यान, सणाच्या काळात आपल्या गावी व धार्मिक स्थळी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व नियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडलेली नसल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक, माहितीपर बॅनर्स, वाहतूक जनजागृती संदेश, तात्पुरत्या पार्किंग सुविधा तसेच मार्गदर्शन व्यवस्था विविध ठिकाणी उभारण्यात आल्या असून प्रशासनाने उत्सव काळातील वाहतूक व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले...

एकूणच, वाढती वाहनसंख्या, सणाची लगबग आणि अवजड वाहनांची उपस्थिती यामुळे वाहतूक व्यवस्थापन प्रशासनासाठी मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी पोलीस, प्रशासन व स्वयंसेवी घटकांच्या समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले... वाहतूक नियमांचे पालन, संयमित वाहनचालना आणि नागरिकांचे सहकार्य यामुळेच सणासुदीतील प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होऊ शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post