मुंबई गोवा महामार्ग (NH- 66) : दरवर्षी शिमगा, गणेशोत्सव किंवा अगदी मे महिन्याची सुट्टी जवळ आली की कोकणातील चाकरमान्यांच्या आणि त्यांच्या कोकणवारीचीसुद्धा तितकीच चर्चा होते... कोकणात पोहोचवणाऱ्या आणि तिथून पुढं गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची स्थिती याच कोकणवासियांसाठी आता डोक्याला ताप ठरताना दिसत आहे... मागील कित्येक वर्षांपासून हा महामार्ग पूर्ण होण्याचं नाव घेत नसून, त्यामागून अनेक प्रस्तावित प्रकल्पाची कामं पूर्णही झाल्यानं नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता नव्या मुद्द्यानं डोकं वर काढलं असून, अद्यापही हा महामार्ग तयार नसताना त्यावर तीन टोलनाके येणार आहेत त्यांच्या बांधकाम प्रक्रियेनं नव्या वादाला हवा दिली आहे... मुंबई गोवा महामार्गावरील काही टप्प्यांचं काम अजूनही अपूर्ण स्थितीत असतानाच येत्या काळात नागरिकांना या वाटेवरून जाताना तिहेरी टोलचा भुर्दंड सोसावा लागणार अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे...
उपलब्ध माहितीनुसार या महामार्गाचा पहिला टप्पा असणाऱ्या पळस्पे ते इंदापूरच्या 90 किमी अंतरा दरम्यान खारपाडा आणि खांब इथं दोन टोलनाके असतील. ज्यामुळं या मार्गावरून दुहेरी टोल भरावा लागणार आहे. तर, लोहारे इथंसुद्धा टोलवसुली लागू केली जाऊ शकते, जिथं टोलनाक्याचं बांधकाम पूर्ण होऊन आता सिग्नल यंत्रणाही सुरु करण्यात आली आहे...
रस्ता पूर्ण नाही झाला, तर पैसे कसले? महामार्गाचं काम मागील अनेक वर्षांपासून ताटकळलंय शिवाय त्याची प्रगती अतिशय धीम्या गतीनं सुरू असल्याची वस्तूस्थिती असताना टोल कसला द्यायचा? असा उद्विग्न प्रश्न या मार्गानं प्रवास करणारे नागरिक आणि पर्यटक विचारत आहेत... सततची वाहतूक कोंडी, रस्त्याची कामं, अपूर्ण सुविधा, अपघातांचे वाढते प्रमाण अशा समस्यांवर तोडगा निघत नसल्यानं ही संभाव्य टोलवसुली काही नागरिकांना रुचलेली नाही...
विधानपरिषदेत मुंबई- गोवा महामार्गाचे पडघम...नागरिकांच्या याच समस्यांना विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित करत मुंबई- गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसतानाच खारपाडा इथं टोलवसुली सुरू होणार असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत हा रस्ता पूर्ण होत नाही, तोवर टोलवसुली करु नये अशी मागणी केली. त्यांच्या या मुद्द्यावर उत्तर देत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महामार्गाचं काम 12 टप्प्यांमध्ये सुरू असल्याचं सांगितलं...राष्ट्रीय महामार्ग नियमांचा संदर्भ देत रस्त्याचा काही भाग पूर्ण झाल्यानंतरही टोलवसुली करता येते असं स्पष्टीकरण दिलं... दरम्यान सदर प्रकरणी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करु असंही त्यांनी सुचवलं... त्यामुळं आता टोलवसुलीच्या या मुद्द्यावर शासन कोणता सुवर्णमध्य साधतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
