महाराष्ट्र वेदभुमी

देवलापार येथील आंदोलनाला राज्यमंत्री जयस्वाल यांची भेट

६ एप्रीलला सिल्लारी येथे बैठक घेण्याचे आश्वासन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- तालुक्यातील देवलापार व परिसरात मागील काही कालावधीपासुन वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास तसेच पाळीव जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात अंदाजे २४ नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समिती यांच्या वतीने गेल्या दिनांक १२ मार्च पासून अप्पर तहसीलदार कार्यालय, देवलापार येथे शांततामय धरणे आंदोलन सुरु असुन आज आंदोलनाचा सोळावा दिवस आहे. आंदोलनादरम्यान अनेक राजकिय नेत्यांनी आंदोलन स्थळी भेटी दिल्या आज सोळाव्या दिवशी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलन स्थळाला भेट देत व समस्या जाणून घेत येत्या सहा एप्रील ला सिल्लारी येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आश्वासन दिले आहे. सध्या देवलापार परिसरातील अनेक गावांमध्ये जनजागृती मोहीम सुरू असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेले आहेत. हा प्रश्न केवळ एका गावाचा नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. समितीच्या वतीने शासनाकडे वाघांच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण ठेवणे, कॉरिडोर ला तारेचे मजबूत आणि सोलर युक्त कुंपण करावे, विशेष वन विभाग पथके तैनात करणे, मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देणे, मृतांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकिय नोकरी देणे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत...

साहेब... बैठक येथेच घ्या

आंदोलनस्थळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी येत्या ६ एप्रील ला सिल्लारी येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले परंतु ही बाब उपस्थित आंदोलनकर्त्यांना रुचली नाही, त्यांनी 'साहेब, बैठक येथेच म्हणजे आंदोलन स्थळीच घेण्याचा अट्टाहास धरला '. मात्र यावर मंत्री जयस्वाल यांनी 'हजार लोकात बैठक होत नाही, पन्नास, शंभर लोकात बैठक होते' असे सांगत वाटल्यास बैठकीमध्ये प्रत्येक गावचे सरपंच बोलवा, काही अडचण नाही तसेच बैठक जनता दरबार मध्ये होत नाही... मी तशी बैठक घेत नाही. वाटल्यास बैठकीची रेकॉर्डिंग करू, फेसबुक लाईव्ह करू, काही अडचण नाही ' अशा स्पष्ट शब्दात आंदोलनकर्त्यांना सांगितले...

देवलापार परीसरात आजपर्यंत वाघाच्या हल्यात एकूण ३४ लोकांवर हल्ले झालेत त्यात  १४ व्यक्ती मरण पावले असून २० लोकं जखमी झाले आहेत... मृत व्यक्ती मध्ये १० माणसं असून ४ महीला शेतकरी आहेत... जखमी मध्ये १४ पुरुष शेतकरी असून ६ महीला शेतकरी आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post