महाराष्ट्र वेदभुमी

पाणीपुरवठा सुधारला; २४ -२५ फेब्रुवारीला देखभालीमुळे बंद - प्रभाग १६मधील काही भागात नवीन पाईपलाईन अद्याप प्रलंबित


माणगाव :- (नरेश पाटील) शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मागील आठ दिवसांपासून लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे... पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित, वेळेवर आणि चांगल्या दाबाने होत असून ठरलेल्या पूर्ण कालावधीत अखंडितपणे पाणी उपलब्ध होत आहे... स्वच्छ व दुर्गंधीरहित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे...

मागील आठ आठवड्यांत पाणीपुरवठ्यातील त्रुटींविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती... त्यानंतर रविवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ पासून पुरवठा अधिक शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याचे दिसत आहे...

दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त जलपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या AMRUT (अमृत) पाणी योजना अंतर्गत शहरातील १७ प्रभागांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्याचे दिसत आहे... सुमारे पाच महिन्यांपूर्वी या नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे... शहरातील अनेक मुख्य रस्ते व अंतर्गत जोडरस्त्यांवर नव्या लाईन बसविण्यात आल्या आहेत...

मात्र प्रभाग क्रमांक १६ खांदाड येथे डोंगरे यांच्या घरापासून ते महेश (बाळा डीजे) पोवार यांच्या निवासाजवळील एका चाळपर्यंत तसेच महेश पवार यांच्या परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे... मुख्य रस्ता व जोडरस्त्यांवरील हा भाग वगळता इतरत्र काम पूर्ण झालेले असताना संबंधित परिसरात पाईपलाईन बसविणे बाकी राहिल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे...

दरम्यान, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व देखभाल कामासाठी दिनांक  २४ -२५ फेब्रु २०२६ (मंगळवार व बुधवार) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे व्हॉट्सॲप संदेशांद्वारे समोर आले होते... याबाबत माणगाव नगरपंचायतीशी संपर्क साधला असता, देखभालीसाठी दोन दिवस पुरवठा बंद राहणार असल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे...

पाणीपुरवठ्यात झालेली सुधारणा ही स्वागतार्ह बाब असली तरी प्रभाग १६ मधील प्रलंबित पाईपलाईनचा प्रश्न संबंधित विभागाने तातडीने लक्षात घेऊन निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे... भविष्यातील नियमित व सर्वसमावेशक पाणीपुरवठ्यासाठी उर्वरित कामही लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post