माणगावकरांचा संयम — प्रशासनाकडे तातडीच्या उपायांची अपेक्षा
माणगाव :- (नरेश पाटील) सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील माणगावजवळील घारळ फाटा परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई–कोकण दळणवळणाचा कणा असलेला हा महामार्ग अक्षरशः ठप्प झाला असून, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर दुसरीकडे माणगावकरांनी नेहमीप्रमाणे संयम राखत परिस्थिती सहन केली... मात्र ही कोंडी अपवाद नसून वारंवार घडणारी बाब बनत चालल्याने प्रशासनाच्या वाहतूक नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे...
सायंकाळी सुमारे ६.३० वाजल्यापासून पूर्व, दक्षिण व पश्चिम दिशांकडून एकाच वेळी घारळ फाटा जवळ वाहनांचा ओघ वाढल्याने मुख्य रस्ता, समांतर रस्ता तसेच बायपास मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली... उड्डाणपूलावर तब्बल पाच लेनपर्यंत वाहने अडकून पडली होती. सलग दोन तासांहून अधिक काळ वाहतूक हालचाल पूर्णतः थांबलेली होती...
वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने NH-66 कडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक शिस्त कोलमडली. अनेक वाहनचालकांनी चुकीच्या मार्गाने वाहने वळवण्याचा प्रयत्न केला... बायपास व समांतर रस्त्यांवर उलट दिशेने वाहने शिरल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आणि सर्वच जोडरस्त्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून वाहतूक अक्षरशः ठप्प झाली...
तीन दिवसांच्या सुट्टीमुळे २६ जानेवारी रोजी ही कोंडी शिगेला पोहोचली होती. आठवड्याच्या शेवटी तसेच दीर्घ सुट्ट्यांच्या काळात NH-66 वरील वाहतूक व्यवस्था वारंवार अपयशी ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले... परिणामी मुंबई व कोकणाकडे प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी माणगाव हे ठिकाण मोठा अडथळा ठरत असल्याचे वास्तव समोर आले...
दरम्यान, घारळ फाटा येथील गेल्या जवळपास दोन दशकांपासून रखडलेल्या बायपास रस्त्याच्या कामाला अलीकडे काहीशी गती मिळाली असली तरी तो मार्ग प्रत्यक्षात वाहतुकीसाठी अयोग्य ठरत आहे. प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले स्ट्रिप बॅरिकेड्स व मातीधुळीने भरलेला रस्ता तसेच उखडलेली पृष्ठभाग रचना यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही अनेक वाहने या अर्धवट बायपासवर वळवण्यात आल्याचे निदर्शनास आले...
रात्री सुमारे ८.३० वाजता केवळ दोन महिला पोलीस शिपायांवर संपूर्ण वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असल्याचे दिसून आले. सायंकाळी ६.३० वाजल्यापासून अडकलेली वाहने सुमारे ८.४० वाजल्यानंतर हळूहळू हालचाल करू लागली. त्यानंतर माणगाव शहरातून मुंबईकडे जाणारी वाहतूक क्रमाक्रमाने सुरळीत झाली आणि काही वेळातच वाहने अवघ्या दहा मिनिटांत शहर पार करू शकली, जिथे यापूर्वी प्रवासी तासन्तास अडकून पडले होते...
आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन उड्डाणपूल, त्याखालील मार्ग तसेच डाव्या-उजव्या बाजूच्या रस्त्यांची पाहणी केली. दूरवरपर्यंत वाहनांच्या हेडलाईट्ससह रांगा लागलेली दृश्ये चित्रीत करण्यात आली. मुंबईच्या दिशेने चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांचे चित्रणही नोंदवण्यात आले. वाहतूक कधी सुरळीत होईल, याचा अंदाज घेण्यासाठी अनेक प्रवासी व चालक वाहनाबाहेर उतरून चौकशी करत असल्याचे दिसून आले. बहुतांश प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली...
परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारी एक घटना समोर आली. एस.टी. महामंडळाच्या बसमधील एका वाहकाने पुढील आसनावर बसलेल्या प्रवाशाला मागे जाऊन शांतपणे झोपण्याचा सल्ला दिला. माणगाव जवळ येताच किमान दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागेल, असे त्याने सांगितले होते आणि हा अंदाज प्रत्यक्षात खरा ठरला...
या वृत्तांकनाबद्दल अनेक प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधींचे आभार मानले... विशेष म्हणजे लोणेरे ते माणगाव या संपूर्ण मार्गावर केवळ दोन महिला पोलीस शिपायांशिवाय अन्यत्र कुठेही वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. मात्र माणगाव शहर हद्दीत मोर्बा रोड चौकात नंतर दोन वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे आढळून आले...
NH-66 वरील ही वारंवार उद्भवणारी वाहतूक कोंडी आता केवळ तांत्रिक अडचण न राहता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा, वेळेचा आणि मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न बनली आहे. माणगावकरांचा संयम किती दिवस गृहीत धरायचा, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. दीर्घ सुट्ट्यांच्या काळात कोणतेही पूर्वनियोजन नसणे, अपुरे वाहतूक मनुष्यबळ आणि अर्धवट बायपास व्यवस्था यामुळे संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थापन आराखडा राबवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, NH-66 वरील माणगाव हे नाव भविष्यातही ‘वाहतूक कोंडीचे केंद्र’ म्हणूनच ओळखले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे..
