रामटेक येथील ऐतिहासिक वारसा
वाकाटक इतिहासातील एक सुवर्ण अध्याय
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- नगरधन किल्ला जो पूर्वी नंदीवर्धन म्हणून ओळखला जात असे, ई.स. तिसरा आणि चौथ्या शतकानू शतके विदर्भाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि स्थापत्य विकासात वाकाटक राजवंशाने महत्त्वाची भूमिका बजावली रामटेक तालुका मध्ये असलेला नगरधन (नंदीवर्धन) किल्ला ऐतिहासिक वारसाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. नगरधन किल्ला वाकाटक काळाची राजधानी म्हणून प्रसिद्ध होता. सुमारे २००० वर्षे जुना हा भुईकोट प्रकारचा किल्ला कमळाच्या फुलांनी सजवलेले प्रवेशद्वार, पायऱ्यांसारख्या विहिरी, भूमिगत मार्ग, गडद कक्ष आणि मजबूत तटबंदीसाठी ओळखला जातो. उत्खननादरम्यान वाकाटक राणी प्रभावतीगुप्ताचा मातीचा शिक्का देखील सापडला...
इतिहास:
वाकाटक काळ : (इ.स. ४ वे शतक): हे ठिकाण 'नंदीवर्धन' म्हणून वाकाटक साम्राज्याची राजधानी होते. राणी प्रभावती गुप्ता यांच्या सीलसारखे पुरावे या काळातील सत्तेचे केंद्र असल्याचे दर्शवतात.
मध्ययुगीन काळ: यानंतर राष्ट्रकुट, चालुक्य आणि गोंड राजांनी या किल्ल्यावर राज्य केले, त्यांनी किल्ल्याची पुनर्बांधणी केली..
भोसले काढा (१८ वे शतक): नागपूरचे संस्थापक राघुजी भोसले यांनी १७४० च्या सुमारास किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी त्याची पुनर्बांधणी केली व विस्तार केला...
आधुनिक काळ: हा किल्ला आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे संरक्षित आहे, पण काही ठिकाणी दुरुस्तीच्या अभावामुळे तो पडझडीच्या अवस्थेत आहे...
किल्ल्याची वैशिष्ट्ये:
भुईकोट किल्ला: हा एक सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला आहे.
वास्तुकला: चौकोनी आकाराचा असून त्याला बाह्य तटबंदी आणि बुरुज आहेत. आतमध्ये इमारतींच्या अवशेषांनी त्याची भव्यता दर्शवली आहे...
भूमिगत मंदिर: किल्ल्यातील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे जमिनीच्या खाली असलेले भवानी मातेचे मंदिर, जे एका विहिरीसारख्या रचनेत आहे.
भव्य प्रवेशद्वार: किल्ल्याच्या दरवाजावर गणेश आणि चषकांसारखी शिल्पे आहेत...
संग्रहालय: किल्ल्यात एक संग्रहालय आहे, जे या परिसराचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा दर्शवते.
कला, साहित्य आणि कालिदास
वाकाटक काळात विदर्भातील कला आणि साहित्याची भरभराट झाली. याच काळात महान कवी कालिदास विदर्भात आले असे मानले जाते. रामगिरी पर्वतांपासून प्रेरित होऊन त्यांनी जगप्रसिद्ध महाकाव्य मेघदूत रचले...
मंदिरे आणि स्थापत्य वारसा व अजंठाचे अमर चित्र
रामटेक परिसरात, वाकाटक काळात फक्त नरसिंह मंदिर, रुद्र नरसिंह मंदिर आणि वराह मंदिर बांधले गेले. आजही ही मंदिरे वाकाटक वास्तुकलेची वैशिष्ट्ये आहेत. अजिंठा लेण्यांच्या लेणी क्रमांक १२, १६ आणि १७ मधील भित्तीचित्र कला ही वाकाटक काळातील समृद्ध चित्रकला परंपरेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहे...
वाकाटक वंशाचा उगम
वाकाटक राजघराण्याचे संस्थापक विद्याशक्ती (सुमारे २५० इसवी सन) मानले जातात. त्यांच्या उत्तराधिकारी प्रवरसेनाच्या नेतृत्वाखाली साम्राज्याचा विस्तार झाला. वाकाटक राज्य नंतर चार शाखांमध्ये विभागले गेले, त्यापैकी नंदीवर्धन शाखा सर्वात जुनी मानली जाते. या शाखेने पूर्व विदर्भावर राज्य केले, तर वाशिम केंद्र असलेल्या दुसऱ्या प्रमुख शाखेने पश्चिम विदर्भावर सत्ता गाजवली...
नंदीवर्धन शाखेचे मुख्य शासक
नंदीवर्धन शाखेच्या अंतर्गत, रुद्रसेन पहिला (३३०-३५५), पृथ्वीसेन पहिला (३५५-३८०), रुद्रसेन दुसरा (३८०-३८५), प्रभावतीगुप्त (३८५-४०५), दिवाकरसेन (३८५-४००), दामोदरसेन (४००-४४०), नरेंद्रसेन (४४०-४६०), आणि पृथ्वीसेन द्वितीय (४६०-४८०) यांसारखे राज्यकर्ते विदर्भाला राजकीय स्थैर्य आणि सांस्कृतिक समृद्धी दिली...
