हेल्मेट व सीटबेल्टचा सदैव उपयोग करणाऱ्या वाहन चालकांना पुष्पगुच्छ देऊन केले सन्मानित
सोगाव - अब्दुल सोगावकर : रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात विशेष 'रस्ता सुरक्षा सप्ताहाचे' आयोजन करण्यात येतो. याचा उद्देश म्हणजे वाहन चालवताना वाहनचालक व त्यांचे मालक वाहतूक नियमांचे पालन करत आपली व इतरांची काळजी घ्यावी, जेणेकरून अपघात होऊन जीवितहानी व वित्तहानी होऊ नये यासाठी सदैव जागरूक राहावे, असा आहे. याच कारणाने अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिस विभाग व शुभम पीपीसी, पीएनटी लिमिटेड कंपनी तर्फे बुधवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी अलिबाग - मांडवा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या चोंढी नाक्यावर रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाचे स. फौ. किशोर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले...
यावेळी दुचाकी वाहन चालवताना कटाक्षाने व सदैव हेल्मेटचा उपयोग करीत आपला प्रवास हा सुरक्षित करणाऱ्या चालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच चारचाकी वाहन चालवताना नेहमीच सीटबेल्ट लावणाऱ्या चालक व मालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित वाहनचालकांना व त्यांच्या मालकांना नेहमीच हेल्मेट व सीटबेल्टच्या वापरासोबत वाहतूक नियमांचे पालन करावे, याबाबत सूचना देत जनजागृती करण्यात आली...
चोंढी नाक्यावर रिक्षा चालक - मालक यांना वाहतुकीचे नियम व नियम मोडल्यास होणाऱ्या दंडाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक न करणे, अति वेगाने वाहन न चालवणे, रहदारीचे नियम पाळणे, प्रत्येकाने ड्रेस कोड वापरणे, आपल्या वाहनांची सर्व कागदपत्र अपडेट ठेवणे आदी महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाच्या वेळी शुभम कंपनीचे बादल नायक, दिपक तिवारी, रानोज डे, मुन्ना, सुजित झुंजारराव, आदित्य असे अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या सह वाहनचालक व त्यांचे मालक उपस्थित होते...
फोटो लाईन : चोंढी नाका येथे 'रस्ता सुरक्षा सप्ताह' निमित्ताने वाहनचालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना वाहतूक पोलीस व शुभम कंपनीचे अधिकारी व कर्मचारी,
