माणगाव :- (नरेश पाटील): श्रीवर्धन नगरपरिषदेचे अध्यक्ष अॅड. अतुल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते मा. राजाभाऊ (राजेंद्र) ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन येथे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करताना केवळ औपचारिकता न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला...
हा सामाजिक उपक्रम महाविकास आघाडीच्या वतीने, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. शिवसेना (उबाठा) दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तसेच श्रीवर्धन नगरपरिषदेचे अध्यक्ष अॅड. अतुल चौगुले यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांना फळांचे वाटप केले व त्यांच्या लवकर आरोग्यलाभासाठी शुभेच्छा दिल्या...
या कार्यक्रमास शिवसेना (उबाठा), काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे अॅड. अतुल चौगुले यांनी राजाभाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित असल्याची माहिती शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अधिकृत लेटरहेडवरून काँग्रेस पक्षाच्या तालुका व शहराध्यक्षांना लेखी स्वरूपात कळवली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले आणि हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला...
दरम्यान, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्रीवर्धन शहरातील प्रमुख व महत्त्वाच्या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्ज व फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण श्रीवर्धन शहरात राजाभाऊ ठाकूर यांच्या वाढदिवसाची चर्चा रंगली असून, शहराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते...
श्रीवर्धन नगरपरिषदेचे अध्यक्ष अॅड. अतुल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे राजकारणासोबत सामाजिक जाणीव आणि मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडले. राजाभाऊ ठाकूर यांचा वाढदिवस केवळ उत्सव न राहता जनसेवेचा आदर्श ठरला, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती.
