रामटेक पोलिसांची कारवाई ; ९ आरोपींना अटक
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- तालुक्यातील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नगरधन येथील शेतातील जुगार अड्ड्यावर सापळा रचून मंगळवार (दि.१३) जानेवारीला धाड टाकली. त्यामध्ये ९ जुगारी लोकांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, जुगार साहित्य असा ३.८७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये राहुल नागोराव चौरे (वय २६, रा. वलनी, सावनेर), रितीक सिद्धार्थ बागडे (वय २४), प्रदिप मानिक मारवाडे (वय ३०), निकेश मोरेश्वर मलेवार (वय २५), सचिन सुलके, रवि मानेश्वर, यश कामडी, आशिष कावडे व निखिल शाहुसाखळे सर्व रा. नगरधन यांचा समावेश आहे. नगरधन येथे शिवारात सुरू असलेल्या ५२ ताशपत्त्याच्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जुगार सुरू असताना धाड टाकली. त्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना कायद्याप्रमाणे अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ८७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे...
३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
रामटेक पोलिसांच्या कारवाई दरम्यान पथकाला एकूण ३ लाख ८७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल, ३७ हजार रुपयांचा मोबाइल फोन व ६५० रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
