प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- तालुक्यातील वनपरिक्षेत्र येत असलेल्या गट ग्रामपंचायत बोरडा अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर येथील शेत शिवारात जनावर चरत असतांना बुधवार (दि.१७) डिसेंबरला दुपारी सुमारे ३ वाजताच्या दरम्यान जनावरे चरत असताना अचानक वाघाने हल्ला चढवून एका गोऱ्ह्याला व गायीला जखमी केल्याची घटना घडली... भर दुपारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे... प्राप्त माहितीनुसार, बोरडा येथील महिला शेतकरी श्रीमती पुष्पाबाई कोकोडे व सराखा येथील शेतकरी मोरेश्वर घोडमारे हे आपली जनावरे सत्रापूर शिवारात चारत होते... याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला... शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघ जखमी अवस्थेत जनावरे सोडून जंगलाच्या दिशेने पसार झाला... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे... घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी तात्काळ मनसरचे क्षेत्रसहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांना घटनास्थळी पाठवले... गोंडीमेश्राम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेतला... दोन्ही जखमी जनावरांवर तत्काळ उपचार सुरू असून उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली...
दरम्यान, सत्रापूर व लगतच्या परिसरात अलीकडील काळात वाघाच्या हालचाली वारंवार दिसून येत असल्याने शेतकरी, मजूर व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे... जनावरे चारण्यासाठी एकटे न जाणे, सकाळ -संध्याकाळच्या वेळेत जंगलालगत जाणे टाळणे, तसेच वाघाच्या हालचाली आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे...
