१३ गिधाडांना वाढवून केले नैसर्गिक अधिवासात मुक्त
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत आशादायी आणि ऐतिहासिक क्षणात, पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व पेंच पिपरिया परिक्षेत्रात, सॅडलडॅम जवळील कंपार्टमेंट क्रमांक ५२६ येथे असलेल्या गिधाड पूर्व-मुक्तता अव्हेरीमधून १३ कैदेत वाढवलेली गिधाडे नैसर्गिक अधिवासात सॉफ्ट रिलीज करण्यात आली... या उपक्रमामुळे महाराष्ट्रात अतिशय संकटग्रस्त गिधाड प्रजातींच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. ही गिधाड मुक्तता योजना महाराष्ट्र राज्य वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येत असून, स्वयंपूर्ण व नैसर्गिक गिधाड लोकसंख्या पुन्हा उभी करण्याच्या दीर्घकालीन, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आखलेल्या संवर्धन कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे... ११ डिसेंबर रोजी, जागतिक स्तरावर मान्य असलेल्या सॉफ्ट-रिलीज पद्धतीनुसार ८ पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि ५ लांब चोचीची गिधाडे यांची मुक्तता प्रक्रिया सुरू करण्यात आली... अव्हेरीचे प्रवेशद्वार उघडे ठेवण्यात आले, जेणेकरून पक्षी स्वतःच्या सवडीने बाहेर पडू शकतील... तसेच, अव्हेरीबाहेर अन्नाची व्यवस्था करून नैसर्गिक अन्नशोध व वन्य गिधाडांशी परस्परसंवाद साधण्यास प्रोत्साहन देण्यात आले... सदर कार्यक्रम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक,महाराष्ट्र चे एम. एस. रेड्डी, बी.एन.एच.एस. चे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक श्री. अक्षय गजभिये यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी तज्ज्ञ पशुवैद्य डॉ. मयूर पावशे यांनी गिधाडांच्या आरोग्य व कल्याणासंबंधी सर्व बाबींवर देखरेख केली... त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणी व सतत निरीक्षणाचे कार्य विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, पूर्व पेंच पिपरिया, तसेच समर्पित वनरक्षक कर्मचारी व तांत्रिक पथकाच्या सहकार्याने पार पाडण्यात आले... या मुक्तते दरम्यान एक अत्यंत प्रेरणादायी दृश्य पाहायला मिळाले... यापूर्वी मुक्त करण्यात आलेले आणि स्थानिक पातळीवर ‘जटायु’ म्हणून ओळखले जाणारे गिधाड नव्याने मुक्त झालेल्या गिधाडांशी संवाद साधताना आढळले... त्यानंतरच्या दिवशी, २०२४ मध्ये मुक्त केलेली गिधाडे नव्याने मुक्त झालेल्या गिधाडांसोबत अन्नसेवन करताना दिसून आली, जे सामाजिक बंध, स्थळनिष्ठा आणि यशस्वी पुनर्वसनाचे स्पष्ट संकेत आहेत... याच काळात, नैसर्गिक अधिवासातील वन्य गिधाडेही मुक्तता स्थळाच्या आसपास उडताना व विसावताना आढळली... अशी माहिती किशोर रिठे यांनी दिली...
त्यांच्या हालचालीवर राहणार लक्ष
ही गिधाडे एप्रिल २०२५ मध्ये पिंजोर, हरियाणा येथून आणलेल्या एकूण १४ गिधाडांच्या गटातील असून, त्यांना विशेषतः तयार करण्यात आलेल्या अव्हेरीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते... पांढऱ्या पाठीच्या गिधाडांपैकी एक (झेड३३) सध्या पशुवैद्यकीय उपचाराखाली असून, पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचीही मुक्तता करण्यात येणार आहे. मुक्त करण्यात आलेल्या सर्व गिधाडांना जीपीएस/जीएसएम ट्रान्समीटर बसविण्यात आले असून, त्यांच्या हालचाली, अधिवास वापर आणि जिवंत राहण्याबाबत सातत्याने निरीक्षण करता येणार आहे...
