उरण दि १४(विठ्ठल ममताबादे): विविध व्यासपीठावर आपल्या समालोचन आणि निवेदनातून जनजागृती आणि समाजप्रबोधन करणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन ची वार्षिक सभा चिरनेर येथे नुकतीच पार पडली...
आपल्या समालोचन निवेदनाच्या मिळणाऱ्या मानधनातून काही रक्कम स्वइच्छेने असोसिएशन कडे जमा करून १० वी नंतर गरिबीमुळे शिक्षण घेण्यास असमर्थ असणाऱ्या व ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, शाळांना संगणक, प्रिंटर अशी शैक्षणिक उपकरणे, अपंगांना व्हील चेअर,सायकल, शाळांना ब्लूटूथ स्पीकर, असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या असोसिएशनची नवीन कार्यकारिणी निवड या सभेत करण्यात आली..
असोसिएशनच्या अध्यक्ष पदी राजेंद्र भगत- चिरनेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी हेमाली म्हात्रे - कोप्रोली, यांची तर सचिव पदी सुनिल वर्तक यांची फेर निवड करण्यात आली. खजिनदार पदी पिंट्या घरत- जांभूळपाडा तसेच मिडिया प्रमुख म्हणून विठ्ठल ममताबादे- उरण आणि सल्लागार म्हणून नितेश पंडित मोठीजुई या सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली...
असोसिएशनचे मावळते अध्यक्ष नितेश पंडित यांनी सर्वांचे अभिनंदन करून सर्व सभासदांच्या वतीने पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तर मावळते खजिनदार जीवन डाकी यांनी जमाखर्चाचे वाचन केले त्यास सर्वांनी मंजुरी दिली.
यावेळी असोसिएशनचे सामाजिक कार्य पाहून असोसिएशनला सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवराचे आभार व्यक्त करून यापुढेही असेच सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा सर्वांनी एकमुखाने संकल्प केला...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुनिल वर्तक यांनी केले तर मावळते अध्यक्ष आणि नवनियुक्त सल्लागार नितेश पंडित यांनी असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. मावळते उपाध्यक्ष श्याम ठाकूर यांनी उपस्थितांचे आणि सभेचे आयोजन करून भोजनाची उत्तम सोय करणाऱ्या भगत परिवाराचे आभार मानले...
