रायगड :- (नरेश पाटील): दक्षिण रायगडच्या राजकारणात रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) मधील एक अत्यंत वरिष्ठ व प्रभावी नेता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असून, या घडामोडीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे...
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ नेते काही काळापासून पक्षबदलाबाबत मानसिक तयारी करत असल्याचे समजते. सुरुवातीला ही बाब केवळ अफवा असल्याचे मानले जात होते; मात्र आता या वृत्ताला ठोस स्वरूप प्राप्त होत असून इतर राजकीय पक्षांनीही या घडामोडीची गंभीर दखल घेतली आहे...
आमच्या प्रतिनिधींनी शेकाप पक्षातील काही मजबूत कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, संबंधित वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सहभागी होण्याबाबत सूचक आवाहन केले जात असल्याचे संकेत मिळाले. तथापि, अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, ते शेतकरी कामगार पक्षाशीच एकनिष्ठ राहणार असून पक्षाने आजवर दिलेल्या आधारामुळे ते समाधानी आहेत...
या संभाव्य पक्षबदलामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. एका निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले, “आमचे विद्यमान नेते आमच्याशी संपर्क साधून त्यांच्या मागे येण्याची विनंती करत आहेत; मात्र आम्ही परिस्थितीचा सखोल विचार करूनच निर्णय घेऊ...”
दरम्यान, दक्षिण रायगडातील शेकापची पकड असलेली गावे, विशेषतः माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात, बहुतांश कार्यकर्ते व समर्थकांनी शेकाप पक्षातच ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे वृत्त आहे. यावरून पक्षाची तळागाळातील संघटना अद्याप मजबूत असल्याचे स्पष्ट होते...
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्ह्यात आपली संघटना अधिक बळकट करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असून, त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची राजकीय घडामोड घडत असल्याचे मानले जात आहे...
या सर्व घडामोडींमुळे दक्षिण रायगडच्या राजकारणात पुढील काही दिवसांत कोणते नवे वळण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...