मुख्य बाजार आवारातच विक्री करण्याचे सभापती किरपान यांचे आवाहन
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक:- रामटेक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांना आवाहन करत रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी समितीच्या मुख्य बाजार आवारात धान खरेदी- विक्रीचा भव्य शुभारंभ आयोजित केला आहे... या निमित्ताने दुपारी १२ वाजता काटापूजन कार्यक्रम होणार असून, सर्व संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सभापती सचिन किरपान, उपसभापती लक्ष्मी कुमरे आणि सचिव हनुमंता महाजन यांनी केले आहे...
समितीने यावेळी शेतमालाच्या विक्रीसाठी महत्त्वाचे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत... शेतकऱ्यांनी आपला शेतमाल योग्य भाव, अचूक वजनमाप आणि महत्त्वाचे म्हणजे, नगदी (रोख) चुकाऱ्यासाठी समितीचे मुख्य बाजार आवार शितलवाडी, रामटेक येथेच विक्रीसाठी आणावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे... यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यास मदत होईल... व्यापारी बांधवांना गावखेड्यांमध्ये होणारी अवैध खरेदी पूर्णपणे टाळून, सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार समितीच्या बाजार आवार रामटेक येथेच करून समितीला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे... शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकने धान आणि कडधान्यांच्या बोलीचे (लिलावाचे) सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे... दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी ११ वाजता धानाची बोली तर कडधान्याची बोली दर रविवार आणि गुरुवारी सकाळी ११ वाजता होईल... शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती सचिन किरपान यांनी केलेले आहे...
