महाराष्ट्र वेदभुमी

भागवत एकादशी..भक्तीचा अमृत सोहळा..

 


जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनी तो ।।१।।

सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ।। ध्रु.।।

जन्मजन्मातरिच्या पुण्यरासी । वारी त्याची पंढरी ।। २।।

बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ।। ३ ।।

दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ।।४।।

मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनं ।।५।। 

तुका म्हणे भूवैकुंठ । वाळवंट भींवरा ।।६।। (४२५२)  

भागवत एकादशी अर्थात पंढरपूरची यात्रा... आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशीला वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला जातात...यातील आषाढी व कार्तिकीचा सोहळा हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो...

संत तुकाराम महाराजानी या पंढरपूरचे, यात्रेचे व पांडुरंगाचे सुंदर चित्रण या अभंगातून केलेले आहे...

“जो या गेला पंढरपुरा, आणीक यात्रा न मनी तो”

या अभंगातील पहिल्याच चरणात वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील भक्तीभावाचं सर्वोच्च प्रतीक आहे... एकदा पंढरपूरला गेलात आणि पांडूरंगाच्या चरणी मस्तक ठेवले की, या भूस्थळावरील इतर सर्व तीर्थक्षेत्रांची ओढ आपोआप आटुन जाते... कारण पंढरपूर हे केवळ यात्रेचे ठिकाण नसून जीवात्म्याची त्या परब्रम्हाशी भेट घडविणारे पवित्र अशा तीर्थक्षेत्राची भूमी आहे...

तुकाराम महाराज विठ्ठलाला “सुलभ माय पंढरिराणा” म्हणतात... पांडुरंग हा फक्त देव नाही, तर तो माय आहे... केवळ मायच नाही तर ती सुलभ माय आहे... सुलभ हा शब्द महाराज किती सहजपणे मांडतात जी सोपी आहे ती... मायच्या मनाला लेकरू सोडुन दुसरा कुठलाच विषय शिवत नाही. लेकरासाठी ती कधी ही कोठे ही सहज उपलब्ध असते...तिला शोधणे कधीच अवघड नसते कारण तीची मायाच तिचा धर्म असतो...तसा हा पांडुरंग सहज प्राप्त होणारा आहे... येथे भक्ताला फार काही द्यावे लागत नाही केवळ मनातला भाव हाच श्रेष्ठ ठरतो... म्हणुन ते पांडुरंगाला "सुलभ माय"असे म्हणतात...

माय सदैव आपल्या लेकराची काळजी वाहते... महाराजच म्हणतात,"लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त" लेकरांचा मनोभाव फक्त माऊलीच जाणते.तसा पांडुरंग भक्तांची माय आहे... माय जशी मनाने कोमल, भावनाशील,दयाळु आणि प्रेमळ असते तोच भाव पांडुरंगाच्या ठिकाणी आहे...

भक्ताच्या अंतःकरणातील गूढ भावना, निःशब्द आर्त हाका तो ओळखतो... म्हणूनच संतांना, भक्तांना सारखे वाटते की विठ्ठल हा ईश्वर नाही, तर सख्यभाव आणि ममतेचा अवतार आहे... महाराज पुढे सांगतात,

 “जन्मजन्मातरिच्या पुण्यरासी, वारी त्याची पंढरी।”

वारी म्हणजे केवळ येणे आणि जाणे नाही. वारी कुणालाही जमत नाही... वारीला अनेकानेक जाऊ-जाऊ  म्हणणारे ही जाऊ शकत नाहीत...वारी जेवढी सोपी वाटते तेवढी ती सोपी नाही कारण अनेक जन्मांच्या पुण्यसंचयाचं फळ आहे... ज्या भक्ताला, मनुष्याला देवाशी नातं जडण्याची वेळ आली आहे, त्यालाच विठ्ठलाच्या पायाशी पोहोचण्याचं सौभाग्य ही वारी देत असते..

पुढे ते म्हणतात,

बाहेर येता प्राण फुटे! रडे दाटे गहिवरे!!

वारीला गेल्यानंतर भक्त सारे काही विसरून जातो व तो पांडुरंगाशी लीन होतो.आपल्या काळजी वाहणाऱ्या सख्याचे दर्शन घेऊन पंढरीतून परतताना भक्ताचा जीव गहिवरून येतो.

प्राण कासावीस होतो.मागे वळून पाहताना विठ्ठलाचं दर्शन घेताच डोळ्यांतून अश्रू ओघळतात. तो क्षण म्हणजे भक्त आणि देव यांच्या नात्याचा भावनिक उत्कर्षबिंदू. हे भावनिक नातं महाराज येथे मांडताना ही गहिवरून जातात...

दधिमंगळ भोजन सारा! म्हणती करा मुरडीव!!

मागुता हा पाहों ठाव! पंढरिराव दर्शने!!

पंढरीतून निघताना दहीभाताचे भोजन करतात आणि मुरडीचे कानवले करा, असे म्हणतात. कारण तसे केल्याने पुन्हा हे पंढरीचे ठिकाण मुरडून पहावयास मिळेल...महाराज येथे मुरडुन पाहणे हा शब्द वापरतात... मुरडुन पाहणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा मनातुन अंतःकरणाने विचार करणे व त्यामागील कारणे शोधणे... पंढरपूर आणि पांडुरंग हे अद्वैत भक्तांच्या मनातील भक्ती विचार दृढ करणारे आहे... पंढरपूरचा पांडुरंग त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालेला भक्त हा फार व्यापक असा विषय आहे... की त्यावर मुरडून पाहण्याची गरज आहे... म्हणजे पुन्हा पंढरीला लवकरच मुरडून येता येईल व पांडुरंगाचे दर्शन होईल...असा भाव ते व्यक्त करतात...येथे लक्षात येते की,तुकाराम महाराज म्हणजे जणु शब्द पंढरीचा पांडुरंगच.

अभंगाच्या शेवटच्या ओळींत तुकाराम महाराज म्हणतात —

“तुका म्हणे भूवैकुंठ, वाळवंट भींवरा।”

पंढरपूरला वाळवंट आहे; पण तिथे प्रेममूर्ती विठ्ठल उभा असल्याने तेच वैकुंठ ठरतं... कारण वैकुंठ कुठे आहे हे स्थानावर अवलंबून नसून भावनेवर, भक्तीवर आणि देवप्रेमावर अवलंबून असतं...

पंढरीची वारी म्हणजे देवाकडे जाणारी नव्हे, तर देव आपल्या अंतरंगात आहे हे ओळखण्याची यात्रा...

संतांच्या मते पंढरपूर हा भक्तीचा उगमबिंदू आहे आणि तिथे जाणं म्हणजे आपल्या अंतःकरणातील विठ्ठलाशी एकरूप होणं होय...

भागवत एकादशी निमित्त मनःपुर्वक शुभेच्छा..!! रामकृष्ण हरि!!

कैलासराजे घरत रायगड जिल्हा प्रतिनिधी 

Post a Comment

Previous Post Next Post