मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील): ठाण्यातील वाहतूक विभागाच्या वाढत्या दंडकेंद्रित कार्यपद्धती, व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि नागरिकांवर होणाऱ्या त्रासाविरोधात आज तीन हात नाका सिग्नल येथे सामाजिक कार्यकर्ते अजय जया आणि अजय जया फाउंडेशन (AJF) यांच्या सदस्यांनी प्रभावी नागरिक आंदोलनाची सुरुवात केली... शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सिग्नलवर उभे राहून फाउंडेशनच्या सदस्यांनी एक ठळक संदेशफलक प्रदर्शित केला: “Citizens deserve service, not harassment. Stop treating citizens like fine-collection targets. #remove_trafficDCP_PankajShirshat.” हा संदेश ठाणेकर नागरिकांच्या मनातील नाराजीचा आणि सातत्याने होत असलेल्या त्रासाचा थेट आवाज होता...
या मोहिमेदरम्यान अजय जया यांनी त्यांच्या सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्या की पीक अवरच्या वेळी वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी फक्त दंड वसुलीत गुंतलेल्या आणि वाहनांची कागदपत्रे तपासण्यात मग्न असलेल्या वाहतूक पोलिसांचे टाईम-स्टॅम्प फोटो व व्हिडिओ काढा. हे दस्तऐवजीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठोस पुरावा म्हणून सादर केले जाईल, जेणेकरून या गैरकारभाराची जबाबदारी निश्चित करता येईल...
अजय जया यांनी तीन हात नाका येथील गंभीर उदाहरणावर विशेष लक्ष वेधले, जिथे यलो बॉक्स मार्किंगचा (IRC Code BM-06) सर्रास चुकीचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले... नियमानुसार वाहनचालक फक्त तेव्हाच यलो बॉक्समध्ये प्रवेश करू शकतो जेव्हा त्याला खात्री असते की तो आत थांबणार नाही... या जागेत वाहन थांबवणे वा पार्क करणे कोणत्याही परिस्थितीत दंडनीय आहे... या नियमांचा उद्देश वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात त्याच्या पूर्ण विरुद्ध परिस्थिती दिसून येत आहे...
उड्डाणपुलाखालील याच यलो बॉक्सच्या भागात सुमारे १० ते १५ वाहतूक पोलिस मध्य रस्त्यावर वाहनांची अडवणूक करत उभे असतात... येथे हिरवा सिग्नल फक्त १५–२० सेकंद असताना वाहने तपासणीसाठी थांबवणे हा सर्वात संवेदनशील क्षणी होणारा गंभीर दुरुपयोग आहे... यामुळे दोन लेन पूर्णपणे ब्लॉक होतात, वाहतूक कोंडी प्रचंड वाढते आणि शेकडो नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो... शिवाय जप्त केलेली वाहने सिग्नलखाली व रस्त्यात उभी केल्यामुळे उर्वरित लेनही अडवल्या जातात आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडते...
या निष्काळजी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना अजय जया म्हणाले की वाहतूक पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकसेवा असते, दंड उकळणे नाही. नागरिकांना नियमबद्धता, सोय आणि सुरक्षितता अपेक्षित असते — त्रास, अडथळे आणि अव्यवस्था नव्हे...
अजय जया फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की हे आंदोलन एकदाचं नसून ठाण्यातील दंडकेंद्रित आणि नागरिकविरोधी वाहतूक व्यवस्थेविरोधातली दीर्घकालीन लढाई आहे... फाउंडेशन पुढील काही दिवसांत हे आंदोलन आणखी तीव्र करणार असून नागरिकांच्या वास्तविक समस्या आणि तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे..
