अध्यक्ष रवींद्र चव्हाण रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या पुढाकारामुळे रेल्वे जंक्शनच्या मागणीला गती
रायगड :–(नरेश पाटील): ऐतिहासिक व औद्योगिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या महाड शहराला स्वतंत्र रेल्वे जंक्शन मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महाड शहराध्यक्ष पराग पद्मराज वडके यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता... ही मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असून, स्थानिक नागरिक आणि उद्योग क्षेत्रासाठी ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठिंब्याने वडके यांनी दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाड येथे आमरण उपोषण सुरू केले होते... जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी स्वतः या आंदोलनाला पाठिंबा देत प्रशासनाशी समन्वय साधला...
या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने पुढाकार घेतला असून, संबंधित मागणीबाबत पुढील निर्णय प्रक्रियेसाठी मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय, महाड येथे विशेष समस्यासभा आयोजित करण्यात आली आहे...
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक, प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, रत्नागिरी), तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष पराग वडके आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत...
दरम्यान, वडके यांनी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहिले असल्याने उपोषण मागे घेतले असल्याचे सांगितले...
“महाड शहराला रेल्वे जंक्शन मिळाल्यास औद्योगिक प्रगतीसह पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही चालना मिळेल,” असे त्यांनी नमूद केले...
महाड शहरातील नागरिक, स्थानिक संघटना तसेच औद्योगिक क्षेत्राकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, प्रशासनाकडून होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
