माणगाव (नरेश पाटील): वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र रायगड जिल्हा महिला अध्यक्षा ह.भ.प. सौ. योगिता मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तहसीलदार माणगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली असून, या उपक्रमासाठी सौ.योगिता मोरे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा महिला अध्यक्षा ह.भ.प. सौं. योगिता ताई मोरे, माणगाव तालुका अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ मानकर, गांगण महाराज आणि वारकरी साहित्य परिषद उपतालुकाध्यक्ष ह.भ.प. रमेश दबडे यांच्या नेतृत्वाखाली समस्त वारकरी बांधवांच्या वतीने तहसीलदार माणगाव यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले...
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक गावे पावसाच्या तडाख्यात आली असून, शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे...
शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून, सततच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या शेती उत्पादनाचे मोठे नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे...
प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तसेच नुकसानभरपाई लवकर वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण उपक्रमाची प्रेरणा व पुढाकार सौ. योगिता मोरे यांनी घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेले हे निवेदन शेतकरीहितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. हे निवेदन शुक्रवारी, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी तहसीलदार माणगाव यांच्याकडे सादर करण्यात आले...
