पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर): ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर रोहा तालुक्यासह विविध भागात ढगांच्या गडगडाट विजांचा कडकडाटासह परतीचा वादळी मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याने सोसाट्याच्या वाऱ्यात कोलाड खांब परिसरातील घरांवरील पत्रे उडाली तर उभे असलेले विद्युत खांब वाकले तसेच शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर बाजारपेठेत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली,तर दोन तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस आल्याने व्यापारी दुकानदार तसेच फटाक्यांचे छोटे दुकानदार यांचा मोठे नुकसान झाले. ऐन लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांमध्ये व्यापक नाराजी पसरली. परतीच्या पावसाने दिवाळीच्या आनंदावर पाणी फेरले असून शेतकऱ्यांनी कापणी बांधणी केलेले शेतात पाणी साचले तर उभी असलेली पिके अती वेगाने आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात आडवी होवून धान नाडीच्या मार्गावर असल्याने शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला आहे तर ऐन दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसाने हा हा कार माजवल्याने बळीराजाचे अक्षरशः दिवाळे निघण्याची तसेच उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे तर शहरात तसेच कोलाड खांब बाजारपेठेत अक्षरशः पाण्याची धुंध उडाली दिवाळीच्या तयारीसाठी ऐन बाजारपेठा गर्दीने भरलेल्या असताना या पावसात साऱ्यांची धांदल उडाली...
मंगळवारी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले, जागेवर पंचनामे करण्याचा खटाटोप न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरत भरपाई देण्याचे आदेश संबंधित यंत्रणाला देण्यात आलेत अशी माहिती खा सुनिल तटकरें यांनी दिली तसेच या आधी देखील सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे...
यावर्षी पाच महिन्याहून अधिक काळ पावसाने मुक्काम ठोकला. मे महिन्यात धुवांधार झालेल्या पावसाने बागायती तसेच उन्हाळा भातशेती पिकांचे मोठे नुकसान केले. आंबा, काजू पिके झाडावरच कुजवले. बागायतदार अक्षरशः रडकुंडीला आले. मोसमा आधीच सुरू झालेल्या पावसाने शेतीचे काळचक्र बदलून टाकले. आता ऑक्टोबर अखेर आला तरी पाऊस माघारी जात नाही, याच भयान वास्तवात मंगळवारी सायंकाळी वादळासह आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील भातशेतीची पूर्ततः नासाडी केली. हाता तोंडाशी आलेला सोन्याचा घास हिरावला. ठिकठिकाणी भातशेती पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून गेली. कापणीला आलेल्या भाताने माना टाकल्या, आता भात कुजणार, मोड येणार याच भीतीने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. दरम्यान, वादळी पावसाने सर्वच ठिकाणच्या भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे नुकसान सरसकट ग्राह्य धरली जाईल, शंभर टक्के नुकसान भरपाई दिली जाईल, शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र, सातबारा तातडीने जमा करावा अशी माहिती कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली तर रायगड चे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांनी यांनी देखील तत्काळ सदरील खात्यांना आदेश दिल्याचे समजते...
दिवाळीचा आनंदाचा सण बाजूला ठेवून बळीराजा वादळी भात कापणीला वेग येणार तोच मंगळवारच्या धुवांधार पावसाने होत्याचे नव्हते केले. यंदा भात पीक चांगलेच आले, भरघोस सोना घरात येईल, धनधान्याचे कोठार भरेल याच आशेवर असलेला बळीराजाला अखेरीस मोठा फटका बसला. वादळी पावसाने शेतीतील उभा पीक अक्षरशः झोडपून काढला.भातच आडवा होऊन पाण्यात मिसळला.तर कापणी केलेले करपे पाण्यावर तरंगली, काहीनी रचलेली उडवी यात देखील पाणी शिरले ओव्हळ, नाले पुर्नजिवित झाल्याचे तीनचार दिवस भाताला हलविणे शक्य नाही. शेत जमीन पूर्णतः चिखलमय त्यामुळे भात कुजण्याची भीती व्यक्त झाली. त्यातच अजून चारपाच दिवस पावसाच्या अंदाजे मुक्कामाने शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. जिकडेतिकडे भात पिके आडवी पडल्याचे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. अशा संकटात सापडलेल्या बळीराजाला प्रशासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी कोलाड खांब देवकान्हे विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे...
तर रोहा तहसीलदार,प्रांताधिकारी,कृषिधिकारी यांनी याचा गांभीर्य पूर्वक विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोलाड खांब देवकान्हे परिसरातील कष्टकरी शेतकऱ्यांनी केली आहे...
