उरण दि २५ ( विठ्ठल ममताबादे) :१९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा ९५ वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम चिरनेर येथे गुरुवारी साजरा करण्यात आला.यावेळी उरण पोलीसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून व बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनातंर्गत २५ सप्टेंबर १९३० रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटीश पोलिसांनी निदर्यपणे बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), मोरेश्वर रघुनाथ शिंदे उर्फ न्हावी (कोप्रोली), परशुराम रामजी पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) आदी आठ आंदोलनकर्ते धारातिर्थी पडले. या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २५ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमांचे औचित्य साधून हुतात्म्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला...
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे,आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत दादा ठाकूर,माजी आमदार मनोहर शेठ भोईर,माजी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, उद्योजक पी.पी.खारपाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,उद्योजक राजाशेठ खार पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत,विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत, शेकापचे तालुका चिटणीस रवी घरत, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, भाजपचे धनेश गावंड, तहसीलदार डॉ उध्दव कदम,सहा पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानिफ मुलानी, कामगार नेते भुषण पाटील, सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप परदेशी, तालुका अध्यक्ष दिपक ठाकूर, रमेश म्हात्रे,संजय ठाकूर सह इतर विविध पक्षांच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गावंड व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले..
सदर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेरच्या विविध समस्या संदर्भात व चिरनेर ग्रामपंचायत तर्फे होत असलेल्या विविध विकास कामा संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. गावात महत्वाच्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता नसल्याने रस्त्यासाठी १० लाखाचा निधी कमी पडत होता. ही खंत बोलून दाखविताच खासदार बारणे यांनी १० लाखाचा निधी मिळवून देऊ असे लगेचच जाहीर केले. त्यामुळे सरपंच भास्कर मोकल यांनी खासदार बारणे यांचे आभार मानले...
यावेळी आपल्या मनोगतात संतोष ठाकूर म्हणाले कि चिरनेर ही हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली भूमी आहे.अशा निसर्ग रम्य परिसराचा कायापालट होत नसेल तर ती शोकांतिका आहे.तरी केंद्र व राज्य सरकारने हुतात्म्यांच्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला अ दर्जाचे पर्यटनस्थळ जाहीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.एम एम आर डी ए चा प्रश्न उरण परिसरात जटील बनला आहे. अनेक पत्रव्यवहार करूनही आजतागायत या संदर्भात शासनामार्फत एक सुद्धा बैठक घेण्यात आले नाही. वसई विरार कॉरीडॉर च्या बाबतीत सुद्धा शासना मार्फत एकही बैठक घेण्यात आले नाही.सदर बैठक घेण्यात यावी, यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून खासदार बारणे यांनी पुढाकार घ्यावा व उरणच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी खासदार बारणे यांच्याकडे केली.तर कामगार नेते महेंद्र घरत यांनी सांगितले कि उरण ही क्रांती कारकांची भूमी आहे. अन्याया विरुद्ध लढणाऱ्यांची ही भूमी आहे.मात्र या परिसरात अनेक प्रलंबित आहेत. गेली ५० वर्षे गावठाण विस्तार झालाच नाही. उरण पनवेल तालुक्यात जनतेला पियाला पाणी मिळत नाही. पाणी टंचाई मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे.खासदारांना विनंती करतो कि यात त्यांनी लक्ष घालावे, एम एम आर डी ए चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिरनेरला पर्यटन स्थळचा दर्जा देण्यासाठी जेएनपीटी कडे सी एस आर फंडाची मागणी करावी. या सीएसआर फंडा मधून हुतात्मा स्मारकांचा विकास करण्यात यावा यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी केली.या प्रसंगी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, आदींची भाषणे झाली...
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, हुतात्माचे वंशज, शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी चिरनेर येथील रस्त्याला १० लाखाला मंजुरी देऊन जास्तीत जास्त निधी चिरनेरच्या परिसरातील विकास कामांना देण्याचे आश्वासन दिले. तसेच एमएमआरडीए व वसई विरार कॉरीडॉर बाबत शासन व शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक लावून देण्याचे आश्वासन दिले.उरणच्या विकासासाठी कटी बद्ध असल्याचे सांगितले...
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमांसाठी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले उपस्थित राहणार होते मात्र मराठवाडा विभागात व इतर ठिकाणी राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तसेच पावसामुळे शेतजमीनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने पुरग्रस्त, नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी, पाहणी साठी, मदत करण्यासाठी गेल्याने मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित राहू शकले नाही अशी माहिती आपल्या भाषणात खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांचे पत्रही खासदार बारणे यांनी वाचून दाखविले.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले...