व्याघ्र आणि जैवविविधतेच्या संवर्धनाविषयी केली जनजागृती
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक -: जागतिक व्याघ्र दिनी (दि.२९) निमित्त 'रन फॉर टायगर २०२५' ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकृती, प्राणी आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी आणि व्याघ्र संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र येथे ‘रन फॉर टायगर - २०२५’ या विशेष उपक्रमात २६० धावपटुंनी सहभाग घेतला. स्थानिक ग्रामस्थ, वन अधिकारी, स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमींना एकत्र आणत एक सशक्त सामाजिक जाणीव निर्माण केली. या उपक्रमाचे आयोजन धनेश फाउंडेशन, देवलापार व पेंच व्याघ्र संवर्धन फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते...
रन फॉर टायगर उद्देश केवळ धावण्यापुरता मर्यादित न राहता व्याघ्र आणि जैवविविधतेच्या संवर्धनाविषयी जनजागृती करणे, तसेच स्थानिक नागरिकांचा निसर्ग रक्षणात सक्रिय सहभाग वाढवणे हाच होता. पर्यटन संकुल, सिलारी येथून भर पावसात स्पर्धा सुरू झाली. बफर क्षेत्रातील निसर्गरम्य मार्गावरून अनेक स्पर्धकांनी या दौडमध्ये सहभाग घेतला. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे जंगलातील आराखड्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारे आणि जैवविविधतेचा अनुभव देणारे ठिकाण आहे. बफर गावातील युवक-युवतींपासून ते शहरातील निसर्गप्रेमींपर्यंत एकूण २६० धावपटुंचा उत्स्फूर्त सहभाग होता. अर्पण ब्लड बँक, नागपूर व रोटरी क्लब ऑफ नागपूर, डाउनटाईम यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी यामध्येही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नव्हती, तर निसर्ग व व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल होते. हाच या उपक्रमाचा खरा संदेश होता. पेंच व्याघ्र प्रकल्पातून निघालेला ' वाघ वाचवा, निसर्ग वाचवा ' हा धावपटूंचा हुंकार दीर्घकाळ घुमत राहील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ए. श्रीलक्ष्मी (भा.व.से.), वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी भूषवले तर अक्षय गजभिये (भा.व.से.), उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी संयोजक म्हणून संपूर्ण कार्यक्रमाचे कुशल नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्मित गुप्ता यांनी सहप्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य केले. सोनल मते, विभागीय वनाधिकारी, शांताताई कुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक, संदीप भारती व पूजा लिंबगांवकर, सहाय्यक वनसंरक्षक, माजी पं.स. सभापती चंद्रकांत कोडवते, माजी पं.स. सभापती संजय नेवारे तसेच पेंच प्रकल्पातील सर्व क्षेत्र वनाधिकारी (आरएफओ) यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते...
२६० धावपटुंनी घेतला आवर्जुन सहभाग
'रन फॉर टायगर - २०२५' या विशेष उपक्रमात २६० धावपटूंनी घेतला सहभाग घेतला. विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. बफर गाव विभागासाठी (पुरुष व महिला स्वतंत्र) अनुक्रमे ? १० हजार, ५ हजार व ३ हजार रुपये पारितोषिके देण्यात आलीत. खुल्या गटातील विजेत्यास १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय, फेस पेंटिंग, चित्रकला व निबंध स्पर्धांमधील विजेत्यांनाही विशेष बक्षिसे देवून गौरव करण्यात आला. अमृत वृक्ष लागवड योजनेत वृक्षारोपण करण्यात आले. व्याघ्घ्र संवर्धन आणि जैवविविधता रक्षणासाठी कार्य करणाऱ्या अनेक स्थानिक घटकांचे विशेष सन्मान करण्यात आला. इडीसी अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, आरआरटी सदस्य तसेच मानवी-वन्यजीव संघर्ष निवारणात मदत करणारे कर्मचारी व स्वयंसेवक यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले...
