जेएसडब्लू कंपनीच्या 22 आँगस्टला होणारी जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी) :-
जेएसडब्लू कंपनी डोलवी, पेण येथे धरमतर पोर्टच्या प्रस्तावित फेज 【|||】 कोक प्रकल्पासंबंधी जनसुनावणी दिनांक २२/०८/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या संदर्भात नागरिक म्हणून पत्रकार विजय मोकल यांना पर्यावरण व सामाजिक दुष्परिणाम समजून घेण्यासाठी खालील माहिती आवश्यक होती.1. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (EIA) अहवाल, 2. पर्यावरण मंजुरी (EC) आणि संबंधित कागदपत्रे, 3. प्रकल्पासंबंधी इतर आवश्यक मंजुरीचे तपशील, 4. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि उपाययोजना, 5. पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचे अभ्यास अहवाल, 6. खर्चाचा तपशील, 7. जनसुनावणीसंबंधी कागदपत्रे.
सदर माहिती मिळवण्यासाठी दिनांक २९ /०७/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जेएसडब्लू कंपनीच्या अलिबाग गेट येथील कार्यालयात त्यांनी सुनिल गायकर यांच्यासह प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी रिसेप्शन येथील महिला सुरक्षा रक्षक यांनी संबंधित विभागात संदेश दिल्यानंतर तेथील महिला कर्मचारी येऊन अर्ज घेऊन गेल्या. थोड्यावेळाने साहेबांचा फोन लागत नाही थोडे थांबा असे सांगितले. त्यानंतर ४.४० ला कुंदन गद्रे हे अधिकारी आले. त्यांना वरील विषयां बाबत पत्र दिले असता कुंदन गद्रे यांनी असे कोणतेही पत्र घेण्याची ‘प्रोव्हिजन नाही’ असे सांगत पत्र स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
ही बाब पर्यावरण जनसुनावणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि नागरिकांच्या हक्कांवर थेट आघात करणारी आहे. यासंदर्भात विजय मोकल यांनी मुख्यमंत्री, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, MPCB, जेएसडब्लू फौंडेशनच्या संगीता जिंदाल मॅडम, प्रांताधिकारी, तहसीलदार, वडखळ पोलीस ठाणे यांच्याकडे मेल व लेखी तक्रार अर्जाद्वारे दाखल केली आहे.
सदर बाब अत्यंत गंभीर असून, जनसुनावणीपूर्वी नागरिकांना माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कंपनीकडून माहिती न देणे ही पर्यावरण जनसुनावणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेला हरताळ फासणारी कृती आहे. यामुळे नागरिकांना हरकती घेण्यासाठी पुरेशी माहिती मिळत नाही आणि जनहित धोक्यात येतो. तसेच एक नागरी म्हणून माझ्या हक्कावर गदा आली आहे. असे विजय मोकल यांनी सांगितले.
1. JSW कंपनीकडून संबंधित सर्व माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत.
2. कंपनीच्या सदर अधिकाऱ्याने माहितीबाबत पत्र घेण्यास नकार दिल्याबाबत चौकशी करावी.
3. पुढील जनसुनावणीमध्ये नागरिकांना वेळेत माहिती मिळेल, याची हमी घ्यावी.
4. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की, नागरिकांनी दिलेली लेखी माहिती/तक्रार कंपनी नाकारू शकत नाही.
5. आँगस्ट महिन्यात अनेक सण आहेत. तसेच गणपती बाप्पाचे आगमन याचं काळात होणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक उत्सवाच्या धामधुमीत असल्याने सदर जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी जेणेकरून नागरिकांना हरकती घेण्यास वेळ मिळेल.
अशी मागणी त्यांनी लेखिपत्राद्वारे केली असून याबाबत मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याचे विजय मोकल यांनी सांगितले...
