महाराष्ट्र वेदभुमी

खांदाडातील जलभरावावर कायमस्वरूपी तोडगा : ज्ञानदेव पोवारांचे आश्वासन

माणगाव :- (नरेश पाटील) मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांनी माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्यासह खांदाड प्रभाग क्र. १६ मधील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी युवक नेते महेश बाळा पवार (डी.जे.) देखील सोबत होते. स्मशानभूमी परिसरासह पाण्याने वेढलेल्या घरांची पाहणी करून ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी जलनिचरा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, डीडीटी फवारणी, नालेसफाई तसेच मोर्बा रोडलगत झालेल्या मातीभरणामुळे वाढलेल्या बॅकवॉटरचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली...

यापूर्वी सोमवारी रात्री, दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी १० वाजता देखील पोवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. अनेक कुटुंबे नातेवाईकांकडे स्थलांतरित झाली असून काहीजण पाण्यात अडकले असल्याची गंभीर परिस्थिती तेव्हा उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली...

दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजता मोर्बा रोडलगतच्या आदिवासी वसाहतीत स्थानिक युवकांना मोटारबोट हाताळणी व बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली. या सर्व मागण्यांवर गंभीरतेने विचार करून खांदाडातील जलभरावाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांनी दिले...

Post a Comment

Previous Post Next Post