संतप्त नागरिकांकडून चालकाची धुलाई
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- नागरिकांच्या गर्दीने सतत गजबजलेल्या नगरधन गावातील रोडवर मद्यधुंद हमलापुरीतील कार चालकाने थरार घडविला... भरधाव मोटारीने नगरधन रोडने जाणार्या २५-३० लोकांना कट मारत कहर केला... ग्रामस्थाने पाठलाग करून त्याला पकडून संतप्त जमावाने कारचालकाची बेदम धुलाई केली... हा थरारक प्रकार रविवार (दि.०३) ला रात्री ८.१५ गावातील रोडवर घडला... सुदैवाने प्राणहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला...
माहितीनुसार, हर्षपाल महादेव वाघमारे (४०) रा. हमलापुरी, ता. रामटेक हा भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असून काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आला होता... त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते... रविवारी रात्री दारूच्या नशेत त्याने आपली आय टेन कार (एम.एच.४०-सी.ए.६३७७) चालवण्याचा प्रयत्न केला... नगरधन गावातील साई मंदिर व दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जाताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरील २५ ते ३० लोकांना कट मारून जीवघेणा धोका निर्माण केला... पळ काढण्याच्या प्रयत्नात त्याची कार हनुमान मंदिर परिसरात झाडावर आदळली आणि नंतर रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पडली. घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करत पकडून चांगली धुलाई केली... यानंतर उपस्थितांपैकीच रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती दिली... तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले... मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्ष वाघमारेला ताब्यात घेत रामटेक येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले... रामटेकचे ठाणेदार रवींद्र मानकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत...
