महाराष्ट्र वेदभुमी

रेवदंड्यातील हुतात्मा वाडेकर स्मारकाची दुर्दशा : देशभक्ती की नौटंकी?

अलिबाग-रेवदंडा : १५ ऑगस्ट म्हणजे देशभक्तीच्या गोडगोष्टी, ध्वजारोहण आणि भाषणांचा पाऊस! पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचं रेवदंड्यातील स्मारक मात्र उपेक्षेच्या खोल खाईत ढकललं गेलय... स्मारकाभोवती वाढलेली झाडझुडपं, गेटजवळ कचऱ्याचे ढिगारे, परिसरातील दुर्गंधी, स्मारकाच्या आत बकऱ्यांचा गोठा, दिवसाढवळ्या प्रेमी युगुलांचं मनमोकळं ‘मनोमिलन’ आणि रात्री दारुड्यांचा व गर्दुल्यांचा अड्डा – ही हुतात्म्याच्या स्मारकाची विदारक प्रतिमा प्रशासन, स्थानिक नेते आणि जनतेच्या डोळ्यांआड कशी राहिली?

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशभक्तीची भाषा करणाऱ्यांनी एकदा तरी या स्मारकाला भेट द्यावी – मग कळेल खऱ्या देशभक्ताचा, शेषनाथ वाडेकरांचा अपमान कसा सुरू आहे... “हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेतो” हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकवले जाते... पण बकऱ्यांचे गोठे, गर्दुल्यांचे अड्डे आणि कचऱ्याचं डंपिंग ग्राउंड जर या बलिदानाच्या स्मारकात असतील, तर ती ‘राष्ट्रभक्तीची फसवणूक’ नाही का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, रायगड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत यांचं याकडे लक्ष वेधणं ही आता काळाची गरज आहे... लोकसहभागाच्या नावाखाली अनेक योजनांची जाहिरात केली जाते, पण हुतात्म्याच्या स्मारकासाठी एक तरी योजना आली का? एक तरी निधी मंजूर झाला का?

रेवदंडा गावातून आता स्पष्ट संदेश येतोय – "पुतळे उभे करायचे, भाषणं द्यायची, फलक लावायचे... पण त्या स्मृतींचं काय?" देशप्रेम केवळ १५ ऑगस्टपुरतं नको, ते कृतीतही दिसलं पाहिजे. देशासाठी रक्त सांडणाऱ्या वीरांचा अपमान करणाऱ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे का?

जर हे वास्तव बदललं नाही, तर ही देशभक्ती नव्हे, फक्त ‘नौटंकी’ ठरेल!—संदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post