सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्या मृतदेहाचे बिट क्रमांक ४७५ मधिल करवाई वनक्षेत्र मध्ये मंगळवारी सकाळी सापडले. मृत गुराख्याचे नाव बालकराम कृष्णा ढोबळे (६०) असे आहे. गुराखी करवाई जवळील लोधा या गावातील रहिवासी होता. या घटनेने गावात खळबळ उडाली. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवलापार वनपरीक्षेत्रातील वाघाची दहशत असल्याने गुराख्यांनी गुरे राखणे बंद केले आहे. गुरांचा चराईचा प्रश्न निर्माण झाल्याने गावातील काही इसम आळी पाळीने गुरे चराईसाठी जंगलात नेत असतात. सोमवारी गुरे चराईसाठी बालकराम ढोबळे देवलापार वनपरिक्षेत्रातील करवाई राउंडच्या बिट क्र. ४७४ गावालगतच्या जंगलात गेला होता. माहितीनुसार, लोधा गावातील रहिवासी बालकराम कृष्णा ढोबळे हे सोमवारी सकाळी ११ वाजता देवलापर बीट अंतर्गत करवाई राउंडच्या बीट क्रमांक ४७४ मध्ये त्यांची गुरे चरण्यासाठी गेले होते. संध्याकाळनंतर गुरे घरी पोहोचली तरी बालकराम घरी पोहोचला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी देवलापर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बीट क्रमांक ४७५ मध्ये गुराखी बालकराम यांच्या विद्रूप मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आरएफओ आर. डोंगरे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवलापर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. वन विभाग व देवलापर पोलिस स्टेशन अधिकारी पुढील तपास करीत आहे...
