पुणे : कृषी सक्षमीकरणाच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या दृष्टीकोनातून पुण्याच्या शिवाजीनगर येथील सिंचन नगर, कृषी महाविद्यालयात देशातील पहिल्या 'आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉन २०२५' या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्टार्टअप स्टॉल्सची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली... ही स्पर्धा १ जून ते ३ जून दरम्यान पार पडणार असून ती आठ क्षेत्रात घेतली जाणार आहे. देशभरातील विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि पारंपरिक शेती करणारे शेतकरी बांधव या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, ही समाधानाची बाब आहे...
कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयासह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं ही हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे... आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी प्रश्न, अडचणी व समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं ही कृषी हॅकॅथॉन संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे... शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे... शाश्वत शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ही काळजी गरज आहे... या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, कीटकनाशक व जैविक खतांचे वैज्ञानिक उपयोग, शेतीमालाची विक्री साखळी सुधारण्यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे...
कोरोना संकट काळात कृषी क्षेत्रानं देशासह आपल्या राज्यात फार मोलाची भूमिका बजावली, ही बाब कधीच विसरता येणार नाही...आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषी पूरक उद्योगांवर आधारित आहे... राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी हॅकॅथॉनची संकल्पना पुढे आली... आपल्या महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅग नावाची योजना सुरू केली आहे... या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आयडी उपलब्ध करून दिला जात आहे... हा फॉर्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याची शेतीसाठी खास ओळख राहील... शेतकऱ्याची जमीन, त्यानं घेतलेलं पीक, मिळालेलं अनुदान-विमा, कर्ज इ. सर्व माहिती आयडीशी जोडली जाईल...

