संजय राऊतांचे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र
कांतीलाल पाटील:(मुंबई) दि.०९ : आगामी महानगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने महायुती सरकार, भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावर टीका करत आहेत... यातच आता संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे...
गेल्याच महिन्यात संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. हे पुस्तक आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते... आता संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना 'नरकातला स्वर्ग' पुस्तक पाठवले आहे... यासोबत एक पत्रही लिहिले आहे... संजय राऊत यांनी पोस्ट करत याबाबत माहिती दिली...
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र……..
सर्व कुशल मंगलच असेल असा विश्वास आहे... सोबत 'नरकातला स्वर्ग' या माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे... देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले... माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला... माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला... विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले... १९७५ च्या आणीबाणी पर्वात हेच घडले व त्याविरुध्द संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते... माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अंधार युग चित्रित झाले आहे... आपल्याला लेखनाचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल, असे संजय राऊतांनी पत्रात म्हटले आहे... संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत, मी त्यांचा आभारी आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले आहे...
दरम्यान, मोहन भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक वाचायला हवे... त्यांच्या स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने जे सरकार सत्तेत आणले आहे, त्या लोकांनी देशाचा कसा नरक केला आहे, हे त्यांना कळायला हवे... या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे... हे या पुस्तकातून सरसंघचालकांना समजेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती...
