कोलाड (श्याम लोखंडे) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सलग्न ग्रामीण शाखा तालुका रोहाची कार्यकारणी सभा कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे शनिवारी 21 जून रोजी तालुका अध्यक्ष रामचंद्र सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.प्रसंगी तालुक्यातील सर्व तालुका कार्यकारणी तसेच विभागीय कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील विशेषतः उत्तर रायगडातील रोहा,सुधागड, पेण,अलिबाग,खालापूर, पनवेल,कर्जत, येथील कुणबी दाखल्याची मोठी समस्या उद्भवत आहे. कुणबी दाखला नसल्याने समाजाला मुलांच्या शैक्षणिक समस्यांसह अनेक सोयी सुविधां पासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी येथील समाजाने शासन दरबारी अनेकदा निवेदन दिली, अनेक आंदोलने केली मात्र त्यावर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही.आम्ही जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत मात्र 1967 चा पुरावा नसल्याने दाखल्यांस अडचणी निर्माण होत असून यावर शासनाकडून उपाय योजना करण्यासाठी संघाच्या मार्फत तसेच रायगड रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने सद्यतिथी दर्शक माहिती संकलित करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जातीच्या दाखल्याचा महत्वाचा विषय हाती घेतला असून त्या साठी संपूर्ण गाव निहाय डेटा येत्या काळात तयार करून शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे...
कुणबी दाखल्यासाठी पुन्हा एकदा या समाजाची जोरदार धडपड सुरू झाली असून आम्ही जिद्द सोडणार नाही न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही या भूमिकेवर येथील कुणबी समाज बांधव ठाम आहे. त्यादृष्टीने या दाखल्याचा पाठपुरावा शासन दरबारी करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पुन्हा एकदा रोहा तालुका कुणबी सर्वेक्षण २०२५ ला धडाक्यात सुरुवात होत आहे...या सर्वेक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम आयोजित सभेत जाहिर करण्यात आला आहे...
सदरच्या सभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला असून यात परिपत्रकाची परिपूर्ण माहिती तसेच अ, ब , क, ड, पत्रक यावर अरुण आगळे सर आणि सतीश भगत यांनी दिली. तर 22 जून 2025 ते 23 जून पर्यंत विभागीय कमिटीने गाव प्रगणकांना सर्वेक्षण परीपत्र उपलब्ध करुन देणे,24 ते 29 जून गाव कमिटीने गाव यादी तयार करणे,30 जून ते 15 जुलै प्रगणकाने प्रत्यक्ष घरोघर फिरून कुटुंब प्रपत्र- अ भरून घेणे.16 ते 21 जुलै गाव प्रगणकाने गाव संकलन प्रपत्र- ब भरून विभागीय कमिटीकडे देणे,22 ते 27 जुलै विभागीय कमिटीने गाव संकलन प्रपत्र- ब वरून विभाग संकलन प्रपत्र- क तयार करणे,28 ते 30 जुलै विभागीय कमिटीने दिलेल्या प्रपत्र -क, वरून तालुका कमिटीने तालुका संकलन प्रपत्र- ड तयार करणे,वरील कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार तालुका कमिटीकडे राहणार आहे.तसेच रोहा तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधवाना आपली वस्तूनिष्ठ माहिती आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना म्हणजेच सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कुणबी बांधावाला द्यावी असे आवाहन रोहा तालुका कुणबी समाजोन्नती संघ यांचे कडून आयोजित सभेत करण्यात आले...
सदरील परिपत्रकात अ मध्ये आपल्या कुटुंबाची कुणबी म्हणून माहिती तर ब मध्ये गाव निहाय घरांची माहिती डेटा भरून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.तसेच यावेळी विभागीय अध्यक्ष यांच्याकडून माहिती घेत त्यांना या परिपत्रकाचं वाटप तालुका अध्यक्ष रामचंद्र सपकाळ ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर तालुका महिला अध्यक्ष दीपिका ताई भगत तसेच प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले...
