आठवड्यात दोनच तास उघळते तलाठी कार्यालय
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील देवलापार येथील महसूल विभागाचे कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित न येणाऱ्या तलाठी यांना नागरिक वैतागून गेले आहेत. येथे कार्यरत असलेले तलाठी कर्तव्य बजावत नसल्यामुळे कामे खोळंबली असून नागरिकही हैराण झाले आहेत. तलाठी कार्यलयाच्या परिसरात तलाठी भाऊसाहेब दिसले का ? अशी शेतकरी विचारणा करताना दिसतात. ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे दाखले मिळत नाहीत. दिवसभर नागरिक व शेतकरी तलाठी कार्यालयासमोर थांबून येण्याची वाट पाहतात. मात्र, तलाठी माञ, कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. या कार्यालयाच्या सर्व किल्ल्या (चावी) कोतवालाच्या हातात असतात. परंतु, तलाठीच नसल्याने कोतवाल तरी काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो. देवलापार पटवारी कार्यालयांतर्गत देवलापारसह कट्टा, पेंढरई, खिडकी व सिंदेवानी या गावांसह महसुली दर्जा नसलेले रामनगर, रामटेकडी, निमटोला ही गावे येतात. आठ ते दहा गावांचा समावेश असतानाही इथे तलाठी दिलीप रांचे केवळ बाजाराच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून मंगळवारीच येतात. त्यातही ते दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान येतात आणि ५ वाजले की गायब होतात. त्यामुळे, शेतकरी व नागरिकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागते...
तलाठी उद्धट स्वभावाचा
तलाठी दिलीप रांचे उद्धट स्वभावाचे असून ते लोकांची कामे वेळेवर करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कामासाठी येणान्यांसोबत त्यांची वागणूक अपमानास्पद असते. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिल्या, त्या सर्व ठिकाणी अशाच तक्रारी नागरिकांच्या आहेत. रामटेक तालुक्यातीलच काही ठिकाणी कार्यरत असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला...
आल्यापावली परततात नागरिक
या कार्यालयात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला काढण्यासंबंधी कागदपत्रे, सात बारा, बँकेच्या कर्जाचा बोजा कमी जास्त करणे, शेतीचे फेरफार याशिवाय निराधार व्यक्तीच्या अर्जावर स्वाक्षरी यासारखी अनेक कामे असतात. परंतु, तलाठी दिलीप रांचे आठवड्यातून एकच दिवस दोनच तासासाठी असतात. त्यांची येण्याची व जाण्याची वेळही निश्चित नसते. त्यामुळे नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. आपला नंबर लागावा म्हणून नागरिक बाजाराच्या दिवशी सकाळी ११ वाजतापासूनच रांगेत लागलेले असतात. कधी कधी तर तलाठी येतही नाही...
प्रशासकीय अधिक्याऱ्याचे दुर्लक्ष
याबाबत अनेक तक्रारी केल्या. परंतु, कोणीच ऐकून घेत नाहीत. हाकेच्या अंतरावर अप्पर तहसीलदार पूनम कदम यांचे कार्यालय आहे. त्यांना या समस्येची अनेकदा कल्पना दिलेली आहे. परंतु, त्यांनीही या तक्रारींकडे दुर्लक्षच केले आहे...
