किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या कार्यतत्परतेमुळे मुद्देमाल महिलेला सुपूर्द,
सोगाव - अब्दुल सोगावकर : आजही माणुसकी जिवंत आहे, म्हणून हे जग अजून तरी तग धरून आहे, आपल्याला मिळालेले हजारो रुपये, सोबत हजारो रुपयांचे दागिने याबाबत मनात कोणत्याही प्रकारचा मोह, लोभ,लालसा येऊ न देता ज्याचे आहे त्याला परत देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपलीय तीसुद्धा एका चक्क आदिवासी बांधवांने. घरात अगोदरच बेताची व अठराविश्व दारिद्र्याची परिस्थिती असताना त्यांना मिळालेले पैसे व दागिने परत करत समाजाला एक प्रकारे चांगला आदर्शवादी संदेश दिला आहे... त्याच्या या महान कार्याची दखल घेत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आदिवासी किसन नाईक याचे कौतुक केले आहे...
याबाबत सविस्तर वृत्त असे, रविवार २५ मे रोजी सकाळच्या वेळी अलिबाग रेवस मार्गावर चोंढी पुलानजीक भररस्त्यात एक कापडाचे गाठोडे पडले असल्याचे बामणसुरे आदिवासी वाडी येथील किसन नाईक हे चोंढीकडे येत असताना त्यांना दिसले, त्यांनी ते गाठोडे घाबरत घाबरत उघडले असता त्यामध्ये पैसे ६५०० रुपये, ७ ग्रॅम वजनाची चैन, अंदाजे १ तोल्याचे गंठण असे दागिने, कपडे, कागदपत्रे व इतर वस्तू दिसून आल्या, सदर मुद्देमाल मिळाल्याबाबतची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना दिली... सरपंच पिंट्या गायकवाड यांनी त्यामध्ये असलेल्या वस्तूंची पाहणी करत काही कागदपत्रांची तपासणी करुन ती एका ठाकूर आदिवासी समाजातील महिलेची असल्याचे समजले, त्यांनी आपल्या मित्रपरिवारांसह त्यांच्याकडे संपर्क साधून आपल्या कार्यालयात बोलावून खात्रीपूर्वक माहिती करून त्यांना सुपूर्द केले...
यावेळी ठाकूर समाजाच्या आदिवासी महिलेने बोलताना सांगितले की, आम्ही भोमोली ठाकूरवाडी येथून पाऊस संपल्यानंतर आपल्या मुलबाळांसह संपूर्ण बिऱ्हाड घेऊन चोंढी परिसरात मोकळ्या जागेत झोपडी बांधून राहत याच भागात मिळेल ती मोलमजुरी करून मे महिन्याच्या अखेरीस आम्ही आमच्या मुळगावी जातो. रविवार दि. २५ मे रोजी सकाळी लवकर सामानाची बांधाबांध करून चोंढी येथून आपल्या भोमोली ठाकूरवाडी येथे रिक्षामध्ये सर्वसामान भरून घरी गेले, घरी गेल्यावर तेव्हा सामानाची पाहणी करत असताना त्या सामानातील एक पैसे, दागदागिने, कागदपत्रे व इतर आवश्यक किमती सामान दिसून आले नाही, महत्त्वाचे असलेले गाठोडे न कळत कुठे पडले माहीत नसल्याने व गेले जवळपास आठ महिने मोलमजुरी व काबाडकष्ट करून दोन पैसे जमवून ठेवले होते, ते सर्व गेल्याने आम्ही सर्व घरातील लोक चिंतेत सापडून अक्षरशः रडायला लागलो होतो, त्याचवेळी चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्याशेठ गायकवाड यांनी आपला हरवलेला ऐवज जसेच्या तसे सापडले असून आपण कोणत्याही प्रकारची चिंता न करता आमच्या चोंढी येथील संपर्क कार्यालयात येऊन घेऊन जा, असा निरोप देत त्यांनी सांगितले... तेव्हा पिंट्या गायकवाड यांची ख्याती व त्यांचे निस्वार्थी कार्य याबद्दल आम्हाला माहीत असल्याने आम्ही निर्धास्त होत त्यांच्या कार्यालयात आलो, तेव्हा सर्व पैसे, दागिने व इतर वस्तू खात्रीकरून आमच्या ताब्यात दिले, असे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले...
आदिवासी किसन नाईक यांनी दाखवलेली माणुसकी व पिंट्याशेठ गायकवाड यांच्यामुळे आपला हरवलेला ऐवज पुन्हा मिळाल्याने ठाकूर आदिवासी महिलेनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासी किसन नाईक व सरपंच पिंट्या गायकवाड यांचे मनापासून आभार मानले...
फोटो लाईन : भोमोली येथील आदिवासी ठाकूर समाजाच्या महिलेचा हरवलेले पैसे व किमती ऐवज सुपूर्द करताना आदिवासी किसन नाईक व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व आदिवासी ठाकूर महिला व त्यांचे कुटुंबीय,