सोगाव - अब्दुल सोगावकर : मुस्लिम समाजातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व स्तरातील महिला व पुरुष बांधव गेले एक महिनाभर कडक उपवास (रोजे) केल्यानंतर रमजान महिन्याची रविवार दि.३० मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या चंद्रदर्शनाने देशभरात सांगता झाली. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवार दि.३१ मार्च २०२५ सकाळी रमजान ईद निमित्ताने मशिदीत विशेष नमाज पठण करण्यात आले. या रमजान ईदचा उत्साह अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे पाहायला मिळाला, एकमेकांशी गळाभेट घेऊन गोड शिरखुर्मा खायला देऊन ईद साजरी करण्यात आली...
रमजान महिन्यात पूर्ण एक महिना उपवास(रोजे), तरावी(दररोज विशेष नमाज), जकात(दान करणे), पृथ्वी तळावरील सर्व मानवजातीसाठी प्रार्थना(दुआ) करण्यात आली. सोमवारी सकाळी लवकर सोगाव जामा मशिदीमध्ये रमजान ईद निमित्त विशेष नमाज पठण करण्यात आले, या नमाजीला लहान मुलांसह सर्व स्तरातील पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अलिबाग पोलिसांसह पंचक्रोशीतील सर्व समाजातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोगाव येथील पत्रकार अब्दुल मुल्ला(सोगावकर) यांना त्यांच्या निवासस्थानी रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर व मित्रपरिवार रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते... याप्रसंगी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. यामध्ये रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, संजय शिंदे, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, खिडकी येथील सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सूचित थळे, सुधाकर ठकरुळ, संतोष बांद्रे, प्रविण घाडी, गितेश ठकरुळ, रोशन अनमाने, प्रतीक पाटील, दिपेश माने तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, प्रदीप पाटील, विजय मोरे यांच्या सोबतच ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावचे असंख्य मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते..
