माना जमातीसाठी ऐतिहासिक क्षण.
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील बोरडा (सराखा) या गावाच्या इतिहासात गावातील पहिला डॉक्टर होण्याचा बहुमान एका आदिवासी मुलीने मिळवला आहे... अथक परिश्रम करून, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेल्या डॉक्टर मुलीचे नाव आहे निवेदिता गजबे! निवेदिता मिळवलेल्या यशाने आणि तिच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तिची आई विद्या, वडील विजयराव आणि गजबे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.. निवेदिता एका माना आदिवासी कुटुंबात डॉक्टर होऊन बोरडा गावचा लौकिक वाढवला आहे... निवेदिताने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर बनण्याची जिद्द ठेवली आणि मेहनतीने अभ्यास केला. सध्या गजबे कुटुंब नागपूरच्या कळमना भागात वास्तव्यास आहे. निवेदिता हिने नागपूर येथे राहून वैद्यकीय शिक्षण घेतले... शिक्षणाच्या प्रवासात तिने अनेक अडथळ्यांचा सामना केला. बोरडा गावात आणि माना जमातीमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र तिच्या यशाचे कौतुक होत आहे... डॉ. निवेदिता ही आजच्या पिढीतील युवक-युवतींसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. “तिने केवळ डॉक्टर पद मिळवलेले नाही, तर संपूर्ण जमातीला उज्वल भविष्याची नवी दिशा दिली आहे...” तिच्या या यशामुळे अनेक पालक आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत अधिक जागरूक होतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे... तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित आणि आदिवासी बांधवांच्या आरोग्य सेवा आणि जनजागृतीसाठी करावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे... केवळ शरीराच्या व्याधी नव्हे, तर लोकांच्या मनात आशा, विश्वास आणि नव्या जीवनाचे बळ निर्माण करावे, अशी सदिच्छा समाजबांधवांनी व्यक्त केली आहे. डॉ. निवेदिता गजबे हिला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे... तिच्या रूपात माना समाजाला एक उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी दीपशिखा लाभली आहे. तिच्या पुढील प्रवासात तिने अधिक उंच भरारी घ्यावी, अशा प्रामाणिक शुभेच्छा सर्वच स्तरांतून दिल्या जात आहेत...
