महाराष्ट्र वेदभुमी

बेलदयात शंकरपट स्पर्धेत प्रेक्षकांचा उत्साह

प्रचंड गर्दीत भरली शंकरपटाची रंगत

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक  : झाडीपट्टीच्या माणसाला शंकरपट आठवणार नाही, असे कसे होणार ? ऐतिहासिक अशा नागपूर जिल्ह्याला अनेक परंपरांसोबत शंकरपटाचीही परंपरा आहे. ग्रामीण भागात तीनशे वर्षांची परंपरा, कृषी संस्कृतीशी नाळ जपलेला शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व आनंदाचा खेळ म्हणजेच बैलांचा 'शंकरपट' होय. शंकरपट हा केवळ खेळ नसून ती ग्रामीण भागाची परंपरासुद्धा आहे. मधल्या काळात न्यायालयाने बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्यानंतर पटप्रेमींचा हिरमोड झाला होता; परंतु पुन्हा बंदी मागे घेतल्यानंतर आता पट शौकिनात उत्साह संचारला असून बेलदा येथील काही हौशी मंडळांनी पाच दिवसांच्या शंकरपटाचे यशस्वी आयोजन केले होते. या शंकरपटाला बाहेरचे 'दर्दी' व स्थानिकांची गर्दी होती. सध्या शंकरपटाचे स्वरूप बदलले असले तरी काही लोकांमध्ये शंकरपटाप्रती असलेले प्रेम कायम आहे. याच भावनेतून बेलदा येथील माजी सरपंच उमेश भांडारकर, दिलीप हरडे, विनोद बम्हनोटे, आकाश पंधरे, अशोक खरोले, तेजराम भांडारकर, कृष्णा भाल, अक्षय कुमरे व इतर आयोजकांनी बेलदा येथे सहा दिवसीय शंकरपटाचे यशस्वी आयोजन केले. शंकरपट असलेल्या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप आले होते. आता जरी शंकरपटाची लोकप्रियता पूर्वीसारखी आज राहिली नसली तरी बालाराम गराड, अमित दीक्षित, महेश मेहर, गौरव जैन, विनोद मरसकोल्हे, राजेंद्र पारखी, निलेश कावळे आदी पटप्रेमी झाडीपट्टीची ही अनमोल परंपरा कायम राहावी यासाठी आयोजनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे... 

लोकांना येतो साहसाचा प्रत्यय

झाडीपट्टीत काही लोक पुढाकार घेऊन आर्थिक नुकसान सहन करुनही झाडेपट्टीचा अनमोल ठेवा कायम राहावा म्हणून शंकरपटाचे आयोजन करतात. त्यामुळे पटाची लोकप्रियता आजही कायम आहे. शंकरपटात बैलांना दाणीवरून धावावे लागते, दाण म्हणजे दोन्ही बाजूने छकड्याची चाके धावू शकतील अशी आखलेली जागा होय. एकदा इशारा झाला की, बैलजोड्या विद्युतलतेप्रमाणे धावत सुटतात. सुसाट धावणाऱ्या जोड्या दाण सोडतात, अशावेळी छकडा हाकणाऱ्या व्यक्तीला आपले कसब वापरून बैल दाणीला लावतो. यात त्याच्या साहसाचाही प्रत्यय लोकांना येतो...

गावात पाहुण्यांची वर्दळ

शंकरपटनिमित्त गावात बाहेरचे पाहुणे सुध्दा येतात. विशेष म्हणजे, याच दिवसाची प्रतीक्षा करीत असतात... त्यामुळे प्रत्येक घरी पाहुण्यांची मांदियाळी दिसून येते. बेलदा, टूयापार येथे ही शंकरपटानिमित्त अनेक लोकांच्या घरी बाहेरगावचे पाहुणे दिसून आले...

Post a Comment

Previous Post Next Post