१४ गिधाडांना प्री-रिलीझ एँव्हियरीमध्ये यशस्वीरित्या हलविले
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- गिधाड म्हटले की या पक्षाकडे पाहण्याचा आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोनातूनच बदलतो. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा गिधाड पक्षी हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. मात्र अतिरिक्त जंगलतोड व पाळीव प्राण्यांच्या शरीरात आढळणारे घातक द्रव्य यामुळे गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. गिधाडांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूर जिल्हातील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच वनपरिक्षेत्र कार्यालयाने गिधाड संवर्धनासाठी पाऊल उचलत, १४ गंभीर संकटग्रस्त गिधाडांना-९ व्हाईट-रंपड गिधाडे आणि ५ लॉन्ग-बिल्ड गिधाडे-पेंच व्याघ्र प्रकल्पातील सॅडलडॅम येथे नव्याने बांधलेल्या प्री-रिलीझ ऍव्हियरीमध्ये यशस्वीरित्या हलवण्यात आले. हरियाणामधील पिंजोर येथील जटायू संरक्षण प्रजनन केंद्रातून (जेसीबीसी) आणलेल्या ३४ गिधाडांच्या ताफ्यातील आहेत. वर्ल्ड अर्थ डेच्या निमित्ताने ही गिधाडे महाराष्ट्रात आणण्यात आली. दोन ते सहा वर्षे वयोगटातील या पक्ष्यांची सखोल आरोग्य तपासणी करून त्यांच्या नैसर्गिक वातावरणात तग धरण्याची क्षमता पाहून निवड करण्यात आली. या उपक्रमात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यातील सहकार्य आहे. भारतामधील नामशेष होत असलेल्या गिधाडांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन आणि परिसंस्थेच्या आरोग्यास बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे...
या प्री-रिलीझ ऍव्हियरीमध्ये गिधाडांना स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे नंतर त्यांना जंगलात सोडताना त्यांची सवय होईल...
या संपूर्ण प्रक्रियेवर पेंचचे वन अधिकारी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ मनन महादेव आणि पेंचचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक बर्डे यांच्या देखरेखीखाली आणि क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर एस. मंकर व उपसंचालक डॉ. भारतसिंह हडा यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण ठेवले जात आहे.
