वनसंरक्षण व संवर्धन बाबत जनजागृती रॅली
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- संपूर्ण जगभर २१ मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. हा दिवस जंगलांचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणातील योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. वन ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा आधारस्तंभ आहेत. हवा, पाणी, अन्न आणि औषधे यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय वन दिनाची घोषणा केली, आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय वन दिवस निमित्ताने पूर्व पेंच उपविभागातील पूर्व पेंच पिपरिया,पवनी (ए.नि), चोरबाहुली(वन्यजीव), देवलापार (वन्यजीव) रेंज मधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची बफर क्षेत्रातील गावात बाईक रॅली काढून वनसंरक्षण व संवर्धन बाबत जनजागृती करण्यात आली, जि. प. प्राथमिक शाळा घोटी येथे शालेय मुलांची प्रभात फेरी व वृक्षारोपण करण्यात आले, अमलतास पर्यटन संकुल येथे टूयापार, सालई , कडबीखेडा, सावरा, पथरई या गावातील लाभार्थ्यांना वन ई सेवा साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच विविध वनसंरक्षण व वनसंवर्धनाशी संबंधित विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर सर्व कार्यक्रमाला डॉ. किशोर मानकर साहेब, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी अध्यक्ष स्थान भूषविले व सर्व कर्मचाऱ्यांना वनाचे महत्व, वन कर्मचारी म्हणून जबाबदारी व जागतीक वन दिवसाची या वर्षीची थीम " वने व अन्नसाखळी" या विषयावर मार्गदर्शन केले.
