माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांचा प्रशासनाला इशारा
शहर सीमा हद्दवाढीचा मुद्दा अधांतरी
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- स्थानिक नगरपालिका हद्दीमध्ये येत असलेले रहिवासी नागरीक तथा व्यावसायीकांकडून न.प. प्रशासनातर्फे कर 'आकारणी करणे अपेक्षीत असतानाही मात्र रामटेक न.प. हद्दीतील काही भागातील रहिवासी नागरिक तथा व्यावसायीकांकडून चक्क आजूबाजूच्या ग्रामपंचायती कर आकारणी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार माजी नगरसेवक धोपटे यांच्या पुढाकारातून उघडकीस आला आहे... सदर प्रकरण धोपटे यांनी उचलून धरत नगर परिषदेचे प्रशाषक असलेले एसडीओ प्रियेश महाजन तथा नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्यापुढे हा प्रकार ठेवून या प्रकरणी त्वरित कारवाई करून मार्ग काढण्याची विनंती केली होती मात्र या गोष्टीला आठ दिवसांच्या वर लोटूनही अद्यापही कोणतीही कारवाई प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून न झाल्याने शेवटी हताश होऊन माजी नगरसेवक दामोदर धोपटे यांनी 'ग्रामपंचायतींच्या तावडीतून नगरपरिषदेचा भाग सोडवा अन्यथा मी जनहित याचिका दाखल करणार' असा इशाराच त्यांनी आता प्रशासनाला दिलेला आहे... त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे...
स्थानीक नगरपरिषद प्रशासनाने याप्रकरणी त्वरीत कारवाई सुरु करावी व ग्रामपंचायतींचा हस्तक्षेप दुर करून यासर्व भागात नगरपरिषद प्रशासनाने कर वसुली तथा विकासकामे करावी अशी मागणी माजी नगरसेवक व अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले दामोधर धोपटे यांनी नगरपरिषद प्रशासनाला नुकतीच आठ दिवसांपूर्वी केलेली होती... तेव्हा त्यांना एसडीओ प्रियेश महाजन तथा न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याप्रकरणी लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले होते... मात्र आठ, दहा दिवस लोटल्यानंतरही याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी धोपटे यांचेवर टोकाची भूमिका घेण्याची वेळ आली... आता पुढील लढाई जनहित याचिकेद्वारे लढू असे त्यांचे म्हणणे आहे... मात्र असे झाल्यास नगरपरिषदेचे प्रशासक असलेले उपविभागीय अधिकारी (महसूल) प्रियेश महाजन तथा नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची याप्रकरणी अनास्था तथा हतबलता दिसून येईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही... न.प. प्रशासनाने कर आकारणी न केलेल्या भागामध्ये अंबाळा तलावाच्या पूर्वकडील भाग, गौळणी नाल्याचा पूर्वकडील भाग, जैन मंदिराचा आजूबाजूचा परिसर, कालंदा देवी मंदिराचा मागचा संपूर्ण भाग (कवडंक), दुधाळा बायपास रोडलगतच संपूर्ण भाग आदी परिसराचा समावेश आहे... हा भाग न.प. हद्दीत येत असतानाही रामटेक शहरालगतच्या काही ग्रामपंचायती येथे कर आकारणी करित आहे...
दुर्दैवाने अद्यापपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही
याबाबद नगरसेवक दामोधर धोपटे यांनी सांगितले की, रामटेक नगरपालिकेचा सुधारित विकास आराखड़ा वर्ष १९९३ला महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीकरीता प्रस्तावित करण्यात आला... संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सदर प्रस्तावास ६ ऑक्टोबर २००१ला उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यासह मुख्य कार्यालय, नगर रचना विभाग, पुणे यांनी मंजुरी दिली... तत्कालीन अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासह नगर रचनां विभाग, नागपूर यांनी त्यास स्विकृती दर्शविली, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही... उलट अनेकदा हद्द वाढीबाबतचे ठराव घेऊन पांढरे कागद काळे करीत राहिले... खऱ्या अर्थाने ६ ऑक्टोबर २००१ ला मंजूर विकास आराखड्याच्या प्रसतावावरती अंमलबजावणी करून भविष्यकालीन वाढीव प्रस्ताव तयार करणे आवश्यक होते... परंतु तसे झाले नाही... तेव्हा स्थानिक नगर परिषद प्रशासनाने याकडे आतातरी जातीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी...
