महाराष्ट्र वेदभुमी

पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; २७ जणांना घेतले ताब्यात



पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

२.९९ लाखांची रोख रक्कम, ११ चारचाकी, १ दुचाकी आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त !

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-नागपूर ग्रामीन पोलिसांनी देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील मुकनापुर येथे रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत पोल्ट्री फार्मवर सुरु असलेल्या जुगार खेळणाऱ्या २७ जणांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात २,९९,१९०/- रुपये रोख, ५२ तासपत्त्यांचे संच, तसेच ११ चारचाकी आणि १ दुचाकी वाहनांसह एकूण ५९.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के यांना गुप्त माहिती मिळाली की, गणेश शरणागते यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये जुगार सुरू आहे. ही माहिती नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

अनिल म्हस्के यांनी सावनेर, खापा आणि केळवद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळी धडक मारली...

जेव्हा पोलीस पोल्ट्री फार्ममध्ये पोहोचले, तेव्हा लाइटच्या उजेडात बरेच इसम जुगार खेळताना आढळले. काहीजण बाहेर टेहळणीसाठी उभे होते. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी शिताफीने २७ आरोपींना ताब्यात घेतले...

या कारवाईत पोलिसांनी ५२ तासपत्त्यांचे संच, २,९९,१९०/- रुपये रोख, तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले. याशिवाय, ११ चारचाकी आणि १ दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील २७ आरोपी असून त्यात बालाघाट, छिंदवाडा, सिवनी, नागपूर ग्रामीण आणि भंडारा जिल्ह्यातील इसमांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक विशाल गिरी (पोलिस स्टेशन खापा) यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवलापार येथे भारतीय न्याय संहिता कलम ११२, तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात वाढलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. पोल्ट्री फार्मसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार चालवल्या जात असल्याने पोलिसांकडून अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post