सहा आरोपीना अटक ; एका वकिलाचा समावेश
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना रामटेकच्या पुण्यश्लोक विद्यानिकेतन हायस्कूल, खुमारी येथे घडली आहे.. प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ रामदासजी बरेकर (वय ५९, रा. शीतलवाडी, रामटेक) यांना शाळेच्या कार्यालयातच जातीवाचक शिवीगाळ करत खुर्चीतून ओढून बाहेर फेकले आणि बेदम मारहाण केली... इतकेच नव्हे, तर शाळेची महत्त्वाची कागदपत्रे, चेकबुक, पासबुक आणि शिक्के जबरदस्तीने लंपास करण्यात आले...या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे...
नीलकंठ बरेकर हे ३१ जानेवारी २०२५ रोजी निवृत्त झाले असले तरी शाळेच्या संचालकांनी त्यांना दोन वर्षांसाठी प्रभारी मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमले होते... रोजच्या प्रमाणे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता ते आपल्या कार्यालयात काम करत असताना, संस्थेतून पूर्वीच बडतर्फ केलेला गजानन पुंड हा त्यांच्याकडे आला... त्याने पुन्हा शाळेत शिपाई पदावर रुजू करण्याची मागणी केली... मात्र, बरेकर यांनी त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय हे शक्य नाही... यावर संतप्त झालेल्या गजानन पुंडने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले... थोड्याच वेळात वासुदेव पुंड, त्याचे दोन मुले अभिषेक पुंड आणि अभिजीत पुंड, पुतण्या प्रविण पुंड, वकील दिनेश बोरकर आणि काही अज्ञात इसम शाळेत पोहोचले... त्यांनी थेट कार्यालयात धडक मारली आणि बरेकर यांना "तू या शाळेचा मुख्याध्यापक कसा?" असे विचारत खुर्चीतून जबरदस्तीने उठवले... त्यानंतर त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करत खुर्चीसह फरशीवर फेकले आणि जबरदस्तीने बाहेर ओढले... बरेकर जमिनीवर पडताच सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले... वासुदेव पुंडने जबरदस्तीने बरेकर यांच्या तोंडावर आणि पाठीवर घणाघाती मारहाण केली... त्याचबरोबर गजानन पुंड, अभिषेक पुंड, अभिजीत पुंड आणि प्रविण पुंड यांनी मिळून लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली... ही घटना शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसमोर घडली, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले... या भ्याड हल्ल्यानंतर वासुदेव पुंड याने बरेकर यांच्या टेबलवरील शाळेचे महत्त्वाचे दस्तऐवज, चेकबुक, पासबुक, शाळेचा शिक्का आणि इतर महत्त्वाच्या फायली जबरदस्तीने हिसकावून घेतल्या आणि घटनास्थळावरून पसार झाला... या संपूर्ण घटनेच्या वेळी संस्थेच्या सचिव रजनी साव (डांगे) शाळेत उपस्थित होत्या. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही ऐकले नाही आणि बरेकर यांना अमानुष मारहाण केली... या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत नीलकंठ बरेकर यांनी थेट रामटेक पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची तक्रार दिली... पोलिसांनी जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविले व तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला... रामटेक पोलिसांनी वासुदेव पुंड, गजानन पुंड, अभिषेक पुंड, अभिजीत पुंड, प्रविण पुंड आणि वकील दिनेश बोरकर यांच्यावर कलम ३२३ (मारहाण), ५०४ (जाणीवपूर्वक अपमान), ५०६ (जीव मारण्याची धमकी), ३५२ (हिंसक कृत्य), आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शाळेच्या मुख्याध्यापकावरच कार्यालयात हल्ला होतो, जातीवाचक शिवीगाळ होते, बेदम मारहाण केली जाते आणि शाळेची महत्त्वाची कागदपत्रे पळवली जातात, ही अत्यंत गंभीर बाब आहे... या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील सुरक्षिततेबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रामटेक पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... तसेच, शिक्षण क्षेत्रात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव कसा होतोय, यावर आता प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे...
