फुंडे _उरण प्रतिनिधी : मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व को.म.सा.प. उरण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 'लेखक-वाचक-संवाद' उपक्रमाचे आयोजन दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात करण्यात आले होते...कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन चव्हाण यांनी केले...या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे वळू लागतील, विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत असे आपल्या प्रास्ताविकात प्रा.गजानन चव्हाण यांनी मत व्यक्त केले... मा.श्री.ए. डी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून १९८० च्या दशकात उरण तालुका संघाची स्थापना करून साधारणतः १०० ते २०० लेखकांना पुढे आणण्याचे काम या लेखक संघाने केले आहे... आपल्या मनोगतात श्री. ए. डी. पाटील म्हणाले की “लेखक म्हणून मला जेव्हा प्रश्न विचारला की तुमचे प्रेरणा स्थान काय? तेव्हा मी म्हणालो की माझं प्रेरणास्थान हे माझे गावं, मुलं, व सर्व भवताल हे माझं श्रद्धास्थान आहे...” लेखक हा आपल्या संवेदनशील मनाने, निरीक्षणाने आपल्या साहित्यात मांडणी करीत असतो...मुलांनी वाचलं पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी आपल्या लेखनातून यायला हव्यात... आगरी बोलीला परदेशात पोहचविण्याचे काम ए.डी.पाटील यांनी केले...
मा.श्री.अजय शिवकर सचिव को.म.सा. प.उरण शाखा, वार्ताहर सकाळ यांनी आपल्या कवितेतून समाजप्रबोधनाचे धडे दिले... श्री.अनिल भोईर यांनी आजच्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले... महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना म्हटले की, आजच्या विद्यार्थ्यांने वाचन केले पाहिजे, आपली आगरी बोली संवर्धन करून आपल्या परिसरात जे उत्तम आहे ते जगपर्यंत पोहचविले पाहिजे... इथली उत्तम मासळी, नाचणीचे पापड, हातसडीचा तांदूळ यांचे पेटंट मिळवायला पाहिजे... विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालय सतत विविध कार्यक्रम राबवित असते... कार्यक्रमास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते, उपप्राचार्य प्रा.दिलीप केंगार, प्रा. संतोष देसाई व इतर प्राध्यापक उपस्थित होते...संयोजन समितीमधील सदस्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले...
