सर्पमित्र आसिफ मलिक यांचे सर्वस्तरातून कौतुक,
सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील एक खाजगी मालमत्तेमध्ये तब्बल ८ फूट लांब व अंदाजे १५ किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या अजगराला चोंढी येथील सर्पमित्र आसिफ मलिक यांनी सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडून देत जीवदान दिले...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बहिरोळे येथील एका खाजगी मालमत्तेमध्ये काही मजूर गवत कापण्याचे काम करत असताना अचानक एक भला मोठा साप दिसून आला, यावेळी भयभीत झालेल्या उपस्थित मजुरांनी इतर ग्रामस्थांच्या सहकार्याने चोंढी येथील सर्पमित्र आसिफ मलिक यांना संपर्क साधून माहिती दिली. सर्पमित्र यांनी त्वरित प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो साप हा अजगर असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी आपल्या कलाकौशल्याने तब्बल ८ फूट लांब व अंदाजे १५ किलो वजन असलेल्या अजगराला पकडून कनकेश्वर येथील जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देत जीवदान दिले. याबद्दल सर्पमित्र आसिफ मलिक यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे...
सर्पमित्र आसिफ मलिक हे गेली काही वर्षे चोंढी पंचक्रोशीत अनेक ठिकाणी आढळणाऱ्या विविध प्रकारच्या अनेक विषारी व बिनविषारी सापांना जीवाची बाजी लावून त्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे महान कार्य करीत आहेत...निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साप हा निसर्गाचा मुख्य घटक आहे... सध्या तयार झालेल्या भातशेतीच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे, तरी शेतकऱ्यांनी व शेतमजूर यांनी शेतशिवारामध्ये काम करताना पायात गमबुट व हातामध्ये रबरी हातमौजे अवश्य वापरावे, असा मौलिक सल्ला देत चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या परिसरात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या सापांना न मारता मला पुढील आसिफ मलिक 7887684678 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना आवर्जून केले आहे...
फोटो लाईन : बहिरोळे येथे ८ फूट लांब अजगराला पकडताना सर्पमित्र आसिफ मलिक,
